एलिस्जा वानात्को नावाच्या एका 11 वर्षीय पोलंडच्या मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्राबाबत सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. या मुलीने पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्राद्वारे, ‘तिला आणि तिच्या आईला गोव्यात रहाण्यास परवानगी देण्याची विनंती केली आह. आम्हाला मदत करा आणि काळ्या यादीतून आमचं नाव काढा, अशी विनवणी या चिमुकलीने पंतप्रधानांना केली आहे. एलिस्जा आणि तिच्या आईला कालावधीपेक्षा अधिक काळ भारतात थांबल्यानं काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे.

(फोटो: ट्विटर/Marta Kotlarska)

एलिस्जाने आपल्या पत्रात लिहिल्यानुसार, ‘भगवान शंकरावर माझी अपार श्रद्धा आणि प्रेम आहे, नालंदा देवी पर्वत आणि गोव्यातील गाईंची केलेली सेवा कधीच विसरता येणार नाही. गोव्यातील माझ्या शाळेची आठवण येतेय, माझ्या शाळेवर माझं नितांत प्रेम आहे. अॅनिमल रेस्क्यू सेंटरमध्ये गाईंची केलेल्या देखभालीची मला आठवण सतावतेय. मी भारतीय नसले तरीही भारताला स्वतःचं घर मानते. कालावधीपेक्षा अधिक काळ भारतात थांबल्यानं आम्हाला काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे. 24 मार्च 2019 नंतर माझ्या आईला भारतात दुसऱ्यांदा प्रवेश नाकारण्यात आला. तिचं नाव ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं. नंतर भारतीय व्हिसाच्या नूतनीकरणासाठी आई श्रीलंकेलाही गेली, परंतु भारतीय अधिकाऱ्यांनी व्हिसा वाढवून दिला नाही आणि परत पाठवलं. मी भगवान शंकर आणि नालंदा देवीकडे मदतीची प्रार्थना करते. मला भारतात परत यायचंय’.

पत्राच्या अखेरीस पंतप्रधान मोदींना उद्देशून तिने, तुम्ही सर्वशक्तिशाली व्यक्ती आहात आणि माझ्या आईची व माझी मदत करु शकतात असंही म्हटलंय. तसंच हिंदुत्व आणि अध्यात्माशीही जोडली गेल्याचं तिने पत्रात नमूद केलं आहे. एप्रिल महिन्यात एलिस्जाची आई मारतुश्का कोतलारस्का यांनी तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना मुलीला भेटू देण्याची परवानगी मागितली होती. त्यावेळी बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिच्या आईला व्हिसा संपल्यानंतरही म्हणजेच कालावधीपेक्षा अधिक काळ भारतात थांबल्यानं ताब्यात घेण्यात आलं होतं. नंतर माणुसकीच्या आधारे तिला आपल्या मुलीला भेटण्याची परवानगी देण्यात आली आणि काहीच दिवसांमध्ये भारत सोडून जावं लागलं. तिची आई ही एक कलाकार आणि फोटोग्राफर आहे. बी-2-बी व्हिसावर तिची आई भारतात आली होती. पण कालावधी संपल्यानंतरही भारत न सोडल्याने त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे. सध्या ह्या माय-लेकी कंबोडियात असून, भारतात परतण्याची वाट पाहत आहेत.