लोकप्रिय कंटेट क्रिएटर असणाऱ्या अभ्युदय मिश्राचं अपघाती निधन झालं आहे. ‘स्कायलॉर्ड’ नावाने लोकप्रिय असणाऱ्या या युट्यूबरच्या बाईकचा अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अभ्युदयचा मृत्यू झाला. सोमवारी २६ तारखेलाच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभ्युदयचं ‘स्कायलॉर्ड’ हे युट्यूब चॅनेल फ्री फायर आणि भारतीय गेमिंग कम्युनिटीमध्ये फारच लोकप्रिय होतं. सोशल मीडियावर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. तो जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमासाठी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर होता. यावेळी त्याच्यासोबत इतर बाईकचालकही होते. ‘एमपी ट्युरिजम रायडींग टूअर’ नावाच्या दौऱ्यावर असतानाच त्याचा अपघात झाला.

बाईकवरुन मध्य प्रदेशमधील खजुराहो येथील पर्यटनासंदर्भातील माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशातून मध्य प्रदेश राज्य सरकारच्या पर्यटन विभागाच्या मदतीने ही मोहीम सुरु करण्यात आलेली. ‘दैनिक भास्कर’च्या हवाल्याने ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार एका ट्रकने अभ्युदयच्या बाईकला धडक दिल्याने अपघात घडला.

नर्मदापूरम- पिपारीया राज्य महामार्गावर सोहागपूर येथे हा अपघात झाला. राज्य महामार्ग २२ वर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने घडक दिल्याने अभ्युदय गंभीर जखमी झाला. त्याला शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं.

अभ्युदयची प्रकृती खालावत गेल्याने त्याला नर्मदापूरम येथे हलवण्यात आलं. त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्याला भोपाळमधील भंन्सल रुग्णालयामध्ये दाखल करताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये पोलिसांनी ट्रक चालाकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु असून अद्याप ट्रक चालकाला अटक करण्यात आलेली नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Popular youtuber abhiyuday mishra aka skylord dies in road bike accident scsg