Why Do People See Porn Bots: तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक, थ्रेड किंवा अन्य एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या बोटांनी भटकंती करत असता आणि अचानक एखादा सॉफ्ट पॉर्न व्हिडीओ किंवा पॉप अप तुमच्यासमोर येतो.. अगदी खजील करून टाकणारा हा प्रसंग एकट्यात घडला तरी ठीक, पण चारचौघात असताना असं काही झालं तर अगदी कुठं लपू आणि काय करू अशी स्थिती होते. चुकून एखाद्याची नजर पडली तरी तो हाच अंदाज बांधतो की, तुम्ही असेच व्हिडीओ बघत असणार म्हणूनच तुम्हाला असे व्हिडीओ दाखवले जात आहेत. पण खरोखरच यात तथ्य आहे का? आपण पॉर्न पाहिल्यावरच अशा प्रकारचे पॉप अप स्क्रीनवर येतात की यामागे कंपनीची काही वेगळी खेळी असते, अशा चर्चा मागील काही दिवसात सोशल मीडियावर रंगल्या आहेत. याचं कारण म्हणजे मेटाच्या माजी कर्मचाऱ्याची थ्रेडवरील पोस्ट. एखाद्या ज्वलंत मुद्द्यावरील चर्चेचं रूप घेतलेलं हे प्रकरण आहे तरी काय चला पाहूया..
फेसबुकचा माजी सहसंस्थापक डस्टिन मोस्कोव्हिटझने एका थ्रेडमध्ये लिहिले होते की, “मला अनेकांनी हा प्रश्न विचारलाय म्हणून सांगतो की, तुम्हाला तुमच्या सर्फिंगदरम्यान पॉर्न बॉट्स दिसतात कारण तुम्ही त्यांच्याशी इंटरॅक्ट (क्लिक करणे, वाचणे, व्हिडीओ प्ले करणे) करता. हे तुमच्या कृतीमुळेच होत आहे त्याचा दोष इतरांना देऊ नका.” एकीकडे ही थ्रेड व्हायरल होताच, यावर नेटकरी अक्षरशः तुटून पडले होते, काहींनी लिहिलं की, “असं काहीच नाही, मी पॉर्न बघत नाही, बघायची इच्छाही नाही. तरी माझ्या कमेंट्समध्ये पॉर्न बॉट्स दिसतात.” काहींनी लिहिले की, “तुम्हाला मुळात ज्यांनी विचारलंय त्यांना सांगा ना आम्हाला सगळ्यांनाच कशाला शिकवताय?”
दरम्यान हे प्रकरण तापताना दिसल्यावर डस्टिनने पुन्हा स्पष्टीकरण देत लिहिले की, एकतर पहिली गोष्ट मी मेटामध्ये काम करत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला फक्त पॉर्न बॉट्सचं दिसणं आणि कधी कधी पॉर्न बॉट्स दिसणं यात फरक आहे, मी पहिल्या प्रकारच्या लोकांना माहिती दिली होती.
दुसरीकडे, लोकांनी या पोस्ट्सवर कमेंट्स करून असेही सांगितले की, इथे आपली चर्चा चालू असताना आम्ही पॉर्न बॉट्स असा शब्द लिहिल्यावर पण आता आम्हाला तशा पोस्ट दिसू लागल्या आहेत. दरम्यान, काहींनी याबाबत उपाय सांगताना लिहिले की, “मी रील्स आणि पोस्टचं गणित असं सेट केलं आहे की मला जे पाहायचं असतं तेच दिसतं, जसं की मला मांजरीचे व्हिडीओ पाहायचे तर मी फक्त मांजरीचेच व्हिडीओ लाईक करते. पॉर्न बॉट्स वगैरे दिसले की थेट ब्लॉक करायचे, तुम्ही तीन वेळा एखाद्या प्रकारची पोस्ट रिपोर्ट किंवा ब्लॉक केली तर ती कदाचितच तुम्हाला परत दाखवली जाईल.” तर काहींनी यावर असंही म्हटलंय की, “आम्ही अनेकदा रिपोर्ट करूनही आम्हाला अशाच प्रकारच्या पोस्ट्स दाखवतात कारण त्या कदाचित त्यांच्यासाठी अश्लील किंवा मर्यादेच्या बाहेर वाटत नाहीत.”