तुम्हाला काही महिन्यांपूर्वीचा पुण्यातल्या कर्वे रोडवरचा एक प्रसंग आठवतोय का? ऐन गर्दीच्या वेळी रस्त्यावर लावण्यात आलेल्या स्क्रिनवर जाहिरातींच्या जागी चक्क पॉर्न क्लिपच सुरू झाली. आधीच वाहतूकीची कोंडी त्यातून अचानक भर चौकात सुरू झालेल्या या प्रसंगाने तिथे आणखीच कोंडी वाढली होती. या प्रकरणाची सोशल मिडियावर जोरदार चर्चा झाली होती. आता असाच काहिसा प्रकार तुर्कीमध्येही घडला आहे. पण इथल्यापेक्षाही तुर्कीतला प्रकार थोडा विचत्रच होता असं म्हणावं लागेल.
तुर्कीतल्या कस्तामोनू शहरातील चौकात सरकारने लाऊडस्पीकर बसवले आहे. सूचना देण्यासाठी स्पीकरचा वापर केला जातो. पण त्यादिवशी मध्यरात्री या लाऊडस्पीकरमधून सूचनेच्या जागी असे काही आवाज बाहेर आले की सगळेच धडपडून जागे झाले असणार हे नक्की. या लाऊडस्पीकरमधून पॉर्न क्लिपमधले अश्लिल संवाद आणि विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. शहरात ठिकठिकणी हे लाऊडस्पीकर बसवले असल्याने साहजिकच आजूबाजूच्या घरात हा आवाज गेला आणि सगळेच खडबडून जागे झाले. आता रात्री अपरात्री असे आवाज ऐकू आल्यावर लोक तरी काय करणार? कानावर हात ठेवण्यापलीकडे त्या बिचा-यांसमोर तरी कोणता पर्याय असणार म्हणा. या प्रकरणानंतर महापौर मात्र भलतेच चिडले. ज्याने कोणी हे असभ्य वर्तन केले त्याला कठोर शिक्षा केली जाईल असेही महापौरांनी सांगितले आहे. दरम्यान कोणीतरी फ्रिक्वेन्सी हॅक करून असा प्रकार केला असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.