हवेत सुरू असलेल्या एअर शोदरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. विमाने हवेत थरारक कसरती करीत असताना अचानक दोन विमानांची आपापसांत टक्कर झाली. या टकरीमुळे झालेल्या भीषण अपघातात एका पायलटचा जागीच मृत्यू झाला. या थरार भीषण विमान अपघाताची भयानक दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
दक्षिण पोर्तुगालमध्ये एअर शोदरम्यान दोन लहान विमानांची टक्कर झाली. या टकरीत एका पायलटला जीव गमवावा लागला; तर एक जण जखमी झाला आहे. पोर्तुगालच्या वायुसेनेने एका निवेदनात म्हटले आहे की, रविवारी दक्षिण पोर्तुगालमध्ये एअर शोदरम्यान दोन लहान विमानांची आपापसांत टक्कर झाली होती. हवाई दलाला हे जाहीर करताना खेद वाटतो की, बेजा एअर शोमध्ये स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ४:०५ वाजता सहा विमानांचा समावेश असलेल्या हवाई प्रदर्शनादरम्यान दोन विमानांचा अपघात झाला.
अपघातानंतर तत्काळ आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर बेजा विमानतळावरील हा एअर शो आयोजकांनी पुढे ढकलला. हवाई दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मृत हा अपघातात सामील असलेल्या एका विमानाचा पायलट होता. आणखी एका पोर्तुगीज किंचित जखमी झालेल्या पायटला बेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आपत्कालीन विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. त्यामध्ये या विमानांमध्ये जोरदार टक्कर होताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एअर शोमधील सामील असलेली सहान विमाने हवेत चित्तथरारक कसरती करीत आहेत. याचदरम्यान सहा विमानांपैकी एक विमान थोडे वरच्या दिशेने जाते आणि दुसऱ्या एका विमानाच्या अगदी जवळ जाऊन पोहोचल्यावर त्या विमानावर जोरात धडकते. या धडकेमुळे विमान हवेतून थेट जमिनीवर कोसळते. पोर्तुगीज मीडियाच्या वृत्तानुसार, या भीषण अपघातात विमानाच्या पायलटचा मृत्यू झाला आहे.
अपघातग्रस्त विमान हे याकोवलेव याक-52 असल्याचे सांगितले जात आहे. ते विमान सोविएत युनियनने डिझाइन केलेले एरोबॅटिक प्रशिक्षण मॉडेल असल्याचे म्हटले जात आहे.