उद्योगपती आनंद महिंद्रा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांचा हजरजबाबीपणा नेटकऱ्यांना चांगलाच भावतो. म्हणूनच त्यांनी केलेल्या पोस्टकडे नेटकऱ्यांचं लक्ष आणि पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव सुरु होतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून नुसत्या पोस्ट करत नाही, संवादही साधतात. कधी कधी मजेशीर पोस्ट करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. आता आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ चर्चेत आहे. व्हायरल व्हिडीओत दोन कावळे मांजराकडून अन्न कसं हिरावून घेतात हे दिसत आहे. कावळ्यांची हुशारी या व्हिडीओतून दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओत एक मांजर काहीतरी खात आहे. मात्र त्या मांजराच्या तोंडून घास हिसकावून घेणं एकाला शक्य नाही. म्हणून दोन कावळ्यांनी युक्ती केली. एका कावळ्याने मांजरीला चोचीने डिवचलं. त्या कावळ्याचा प्रतिकार करण्यासाठी मांजर मागे फिरली. मग काय दुसऱ्या कावळ्याने घास हिरावून नेला.आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ ट्वीट करत लिहिलं आहे की, “लक्षात ठेवा…तुम्ही संघासोबत सहकार्याने काम केल्यास तुम्ही नेहमीच अधिक प्रभावी व्हाल”. या पोस्टसोबत स्माईली टाकून हॅशटॅग मंडे मॉर्निंग असं लिहिलं आहे.
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडीओ नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. तसेच व्हिडीओखाली मजेशीर प्रतिक्रिया देखील देत आहेत.