SDM Jyoti Maurya : आलोक मौर्य आणि ज्योती मौर्य यांच्यात झालेला वाद चर्चेत असतानाच ज्योतीच्या जावेनेही तिच्या पतीला सोडल्याचा दावा केला आहे. मी माझ्या पतीपासून वेगळी राहू लागले आहे असं ज्योती मौर्यची जाऊ शुभ्राने सांगितलं आहे. तिने असं म्हटलं आहे की ज्योतीची फसवणूक झाली आहे. तसंच मी देखील आलोक मौर्यच्या कुटुंबाविरोधात FIR दाखल करणार आहे.
शुभ्राने नेमकं काय म्हटलं आहे?
“माझा पती विनोद मौर्य मद्यपान करुन मला मारहाण करतो. २०१८ मध्येही मी या लोकांविरोधात भूमिका घेतली होती. मात्र त्यावेळी माझी FIR दाखल केली गेली नाही. १० जुलै रोजी मला त्याने ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर मी FIR दाखल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर १५ जुलै रोजी मी ११२ क्रमांकावर तक्रार दिली. माझ्या नवऱ्याने आणि त्याच्या कुटुंबाने हंगामा केला.”
हे पण वाचा- “१५ तास चर्चा, दिवसात १०० वेळा फोन कॉल, SDM ज्योती मौर्य आणि मनिष दुबे…”; आलोक मौर्यंचा आरोप
मला धमक्या दिल्या जात आहेत
“पोलीस आले त्यांनी सगळ्यांची समजूत काढली. माझ्या पतीला ते घेऊन गेले होते. पण समज देऊन सोडलं. मात्र त्यानंतर मला धमक्या दिल्या जात आहेत. तू काही केलंस तरी मी ट्रेनखाली जीव देईन असं मला विनोद म्हणतो आहे. तसंच माझा जीव गेला तर त्यासाठी जबाबदार तू असशील असंही सांगितलं जातं आहे. माझ्या कुटुंबीयांनाही धमक्या दिल्या जात आहेत. जर वेळेवर माझ्या FIR साठीची दखल घेतली गेली असती तर मला हा मानसिक त्रास सहन करावा लागला नसता” असंही शुभ्राने म्हटलं आहे.
हे पण वाचा- “माझे प्रायव्हेट फोटो तो…” ज्योती मौर्य यांचे पती आलोकवर पुन्हा आरोप; व्हायरल चॅट्सबाबत मोठा खुलासा
माझी फसवणूक करण्यात आली
शुभ्राने सांगितलं मी एक शिक्षिका आहे. विनोदचं स्थळ माझ्यासाठी आलं होतं तेव्हा माझ्या कुटुंबीयांशी ते सगळेजण खोटं बोलले. आम्हाला हे सांगण्यात आलं होतं की विनोद मौर्य इंटेलिजेन्स ब्युरोमध्ये काम करतो. मात्र लग्नानंतर मला समजलं की तो क्लार्क पदावर काम करतो. ज्योतीशी लग्न करतानाही आलोकने तिची फसवणूक केली. मी ग्रामपंचातीचा अधिकारी आहे असं त्याने ज्योतीला सांगितलं होतं मात्र तो तिथे शिपाई म्हणून काम करतो. मला आणि ज्योतीला सासरचे लोक छळतात असाही आरोप शुभ्राने केला आहे. माझं लग्न झालं तेव्हा माझ्या कुटुंबाने पाच लाखांची कार, पाच लाख रुपये रोख रक्कम आणि पाच लाखांचे दागिने दिले होते आणि एक प्लॉटही दिला होता. असंही आता शुभ्राने म्हटलं आहे.
२०१८ पासून मला मारहाण
आमच्या लग्नानंतर आम्हाला एक मुलगी झाली. त्यानंतर २०१८ या वर्षात दुसरी मुलगी झाली. दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर माझा मानसिक छळ मोठ्या प्रमाणावर वाढला आणि मला मारहाणही होऊ लागली. यानंतर माझ्या घरातल्यांनी मला प्रयागराज या ठिकाणी एक घर खरेदी करुन दिलं. त्या घरासाठी मीदेखील काही पैसे उभे केल होते. त्यावेळी मला सासऱ्यांनी सांगितलं की ते घर विक आणि जे पैसे येतील ते विनोदला दे. शुभ्राने सांगितलं आता सगळ्या गोष्टी सहन करण्याच्या पलिकडे गेल्या आहेत. मला होणारी मारहाण आणि शिवीगाळ मी सहन करु शकत नाही. त्यामुळे मी विनोदचं घर सोडून वेगळी राहते आहे असंही तिने सांगितलं आहे. आज तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शुभ्राने हे भाष्य केलं आहे.