सध्या लग्नाआधी फोटो काढण्याची म्हणजेच ‘प्री-वेडिंग शूट’ करण्याचे फॅड किंवा ट्रेंड आताच्या तरुण मंडळींमध्ये भरपूर प्रमाणात पाहायला मिळते. आपले शूट सर्वांपेक्षा हटके आणि कायम आठवणीत राहावे यासाठी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना, थीम्स, जागा यांची निवड करीत असतात. त्यासाठी फोटोग्राफर्स बोलावतात; परंतु सध्या अशाच एका प्री-वेडिंग शूटच्या फोटोंपेक्षा, फोटो काढताना घडलेल्या एका किश्शाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याला कारणदेखील तसेच आहे. फोटो काढताना अचानक जोडप्याच्या मध्ये एक साप सळसळ करीत आल्याचे आपल्याला या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.
प्री-वेडिंग शूटचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ @parshu_kotame_photography150 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर झालेला आहे. व्हिडीओमध्ये तरुण आणि तरुणी उथळ अशा नदीमध्ये एका दगडावर बसलेले आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या समोरील बाजूला फोटोग्राफर्सची टीम उभी आहे आणि विविध अँगल्सनी त्या जोडप्याचे फोटो घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते. मात्र, दगडावर बसलेल्या तरुणाचे लक्ष पोज देण्याकडे किंवा फोटोग्राफर्सकडे नसून, त्यांच्यामागे पाण्यात होणाऱ्या हालचालींकडे होते. हा व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीने, “त्या तरुणाला लक्ष कुठे आहे तुझं?” असे विचारल्यावर तरुणाने, “पाण्यात धामण आहे धामण” असे शांतपणे उत्तर दिले. तो नेमकं काय म्हणाला हे सगळ्यांच्या लक्षात येताच हजर असणारी प्रत्येक व्यक्ती शांत उभी राहिली. नंतर तो साप/ धामण सळसळ करीत पाण्यात वाट शोधताना आपल्याला दिसतो. शेवटी कुणाला काहीही न करता त्या जोडप्याच्या मधून तो निघून जातो.
हेही वाचा : AI निर्मित अमूल चीज उत्पादन? असे फोटो व्हायरल करताना जरा तरी ‘शरम’ करा; पाहा काय आहे नेमके प्रकरण….
हे सर्व काही घडत असताना तरुणी काहीशी घाबरली होती. मात्र, असे असले तरीही तिच्या जोडीदाराने तिला हसत आणि समजावत शांत ठेवले होते. कोणत्याही प्रकारचा गोंधळ नसल्याने साप जसा आला, तसा परत निघून गेला.
हा व्हिडीओ पोस्ट होताच सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, लोकांनी त्यावर अनेक प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया पाहू.
“मॅन व्हर्सेस वाइल्ड”, अशी एकाने प्रतिक्रिया दिली. दुसऱ्याने, “ती मुलगी आपल्या जोडीदाराच्या विश्वासावर किती शांत राहिली आहे. तिनं तिची सगळी भीती त्याचा हात घट्ट धरून दूर केली आहे.” असे लिहिले आहे. तिसऱ्याने, “आपल्या जोडीदाराचा आपल्यावर इतका विश्वास असण्याची प्रत्येकाची इच्छा असते,” असे म्हटले आहे. चौथ्याने, “तो मुलगा अजिबात घाबरला नाही. त्याला २१ तोफांची सलामी,” अशी कमेंट केली. तर शेवटी पाचव्याने, “सापांना त्रास दिला नाही, तर ते काहीही न करता, तसेच निघून जातात हे तू आज सिद्ध करून दाखवलंस.” असे म्हणत त्या तरुणाचे कौतुक केले आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर शेअर झालेला असून, आतापर्यंत त्यास ५.४ मिलियन व्ह्युज आणि एक लाख ७१ हजार लाइक्स मिळाले आहेत.