हल्ली लग्नाच्या आधी प्री-वेडिंग फोटोशूट करण्याचा किंवा व्हिडिओ तयार करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. अनेक जोडपे हटके फोटोशूट करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवताना दिसतात. लग्नाआधीच्या आठवणी यामाध्यमातून जतन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अनेकदा हे फोटोशूट किंवा व्हिडिओ प्रत्यक्ष लग्नाच्या ठिकाणी मोठ्या स्क्रिनवर दाखविले जातात. मात्र ‘जरा हटके’ फोटोशूट करण्याची हौस कधी कधी जीवावरही बेतू शकते. आतापर्यंत अशा शेकडो घटना घडल्या आहेत. नुकतेच एक जोडपे फोटोशूट करत असताना गंगा नदीत वाहून जाता जाता वाचले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे वाचा >> Photos: ‘प्री वेडींग फोटोशूट’ प्लॅन करताय? मग ‘या’ भन्नाट Ideas एकदा पाहाच

कुठे सुरू होते फोटोशूट?

उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये गंगा नदीच्या मधोमध जाऊन प्री-वेडिंगचे फोटोशूट करणे दिल्लीमधील जोडप्याला चांगलेच महागात पडले. गंगा नदीत फोटोशूट करत असताना अचानक पाण्याची पातळी वाढली आणि जोडपे गंगा नदीच्या मधोमध अडकले. राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान मनिकांत मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार मानस (२७) आणि अंजली (२५) या दिल्लीतील जोडप्याने गंगा नदीत फोटोशूट करण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा आम्ही जोडप्याला यशस्वीरित्या नदीतून बाहेर काढले, तेव्हा मानस बेशूद्ध पडला होता.

मिश्रा यांनी पुढे सांगितले की, जोडप्याला सुरक्षितरित्या बाहेर काढल्यानंतर त्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तत्पूर्वी स्थानिक पाोलिस ठाण्यातून आमच्याशी गुरूवारी संपर्क साधण्यात आला होता. सिंगतोली परिसरातील नदीपात्रात एक जोडपे गेले असून पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे ते मध्यभागी फसल्याचे सांगितले गेले. जवान दीपक नेगी यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करून त्यांच्यावर या मोहीमेची जबाबदारी सोपविली. आम्ही जेव्हा घटनास्थळी पोहोचलो, तेव्हा सदर जोडपे जवळपास वाहूनच जाणार होते, असेही मिश्रा म्हणाले.

हे वाचा >> लग्नाआधीचे फोटोशूट चांगलेच राहील लक्षात; फोटो काढताना अचानक ‘या’ पाहुण्याने लावली हजेरी, पाहा व्हिडीओ

तथापि, स्थानिकांच्या मदतीने राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाने सदर जोडप्याला यशस्वीरित्या नदीतून बाहेर काढले. फोटोशूटसाठी जेव्हा जोडपे पाण्यात उतरले तेव्हा पाण्याची पातळी अतिशय कमी होती, मात्र एवढ्या अचानक पाण्याची पातळी वाढेल, याची त्यांना कल्पना आली नाही, असेही मिश्रा म्हणाले.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील एका प्री-वेडिंग शूटचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये तरुण आणि तरुणी एका नदीमध्ये बसून व्हिडिओ काढत होते. मात्र, जोडप्यामधील तरुणाचे लक्ष पोज देण्याकडे किंवा फोटोग्राफर्सकडे नसून, त्याच्यासमोर पाण्यात होणाऱ्या हालचालींकडे होते. हा व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीने, “त्या तरुणाला लक्ष कुठे आहे तुझं?” असे विचारल्यावर तरुणाने, “पाण्यात धामण आहे धामण” असे शांतपणे उत्तर दिले. तो नेमकं काय म्हणाला हे सगळ्यांच्या लक्षात येताच हजर असणारी प्रत्येक व्यक्ती शांत उभी राहिली. नंतर धामण जातीचा साप सळसळ करीत पाण्यात वाट शोधताना आपल्याला दिसतो. शेवटी कुणाला काहीही न करता त्या जोडप्याच्या मधून तो निघून जातो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pre wedding shoot goes horribly wrong as couple gets stuck in waterfall kvg