Pregnant Woman Threatened By Ola Cab Driver: दिल्लीतील एका गर्भवती महिलेने आरोप केला आहे की, नोएडा एक्सटेंशनमधील एका ठिकाणाहून दिल्लीतील साकेत येथे जाताना एका ओला कॅब ड्रायव्हरने तिला तिच्या गर्भात असणाऱ्या बाळाला इजा करण्याची धमकी दिली.

लिंक्डइनवरील एका पोस्टमध्ये, सुरक्षेच्या कारणास्तव तिची ओळख गुप्त ठेवण्याची विनंती करणाऱ्या महिलेने इंडियाटुडे.इनशी बोलताना सांगितले की, जेव्हा तिने ड्रायव्हरला एसी चालू करण्यास सांगितले तेव्हा त्याने स्पष्टपणे नकार दिला.

गर्भवती महिलेची लिंक्डिन पोस्ट (Pregnant Woman Ola Driver Dispute)

“चेरी काउंटी (नोएडा एक्सटेंशन) पासून साकेत, नवी दिल्ली पर्यंत मी ओला कॅब बुक केली होती” ती म्हणाली, “प्रवासादरम्यान मी ड्रायव्हरला एसी चालू करण्याची विनंती केली, परंतु त्याने नकार दिला.”

तिने आग्रह धरल्यावर, ड्रायव्हर आक्रमक झाला. “मी गर्भवती आहे हे माहित असूनही, त्याने मला ‘तेरे पेट में लात मार के बच्चा गिरा दुंगा’ (मी तुझ्या पोटात लाथ मारेन आणि तुला बाळ गमवावे लागेल) असे म्हणत धमकी दिली,” असे तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तिने पुढे असा दावा केला की ड्रायव्हरने तिला रस्त्यातच खाली उतरण्यास भाग पाडले आणि “अभी आगे देखो क्या क्या होता है” असे म्हणत तिला इशारा दिला.

या घटनेसंदर्भात लिहित असताना महिलेने ओला आणि त्याचे सीईओ भाविश अग्रवाल यांना पोस्टमध्ये टॅग केले आणि ड्रायव्हरवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. “हे वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि त्यामुळे मला प्रचंड ताण आला आहे आणि भीती वाटत आहे. मी तुम्हाला ड्रायव्हरविरुद्ध त्वरित आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती करते,” असं ती म्हणाली.

महिलेने सांगितले की तिने या घटनेची तक्रार ओलाच्या कस्टमर सपोर्टकडे केली आहे आणि महिला हेल्पलाइनलाही ही घटना कळवली आहे.

प्रतिसादात, कंपनीने महिलेला आश्वासन दिले की ड्रायव्हरविरुद्ध “योग्य कारवाई” करण्यात आली आहे. तिने ओलाच्या प्रतिसादाचा स्क्रीनशॉट शेअर केला.

“भविष्यात अशा समस्या दूर व्हाव्यात म्हणून आम्ही पार्टनरविरुद्ध योग्य ती कारवाई केली आहे,” असे त्यात म्हटले आहे.

तथापि, महिलेने सांगितले की तिने ओलाला परत पत्र लिहून “योग्य कारवाई” म्हणजे नेमके काय हे स्पष्ट करण्यास सांगितले.

त्या महिलेच्या पोस्टवर ऑनलाइन अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. “हे खूप चुकीचे आहे. जर तुमच्याकडे गाडीचा नोंदणी क्रमांक असेल तर तो शेअर करा आणि ड्रायव्हरचा फोटोही द्या,” असे एका युजरने म्हटले, तर दुसऱ्या युजरने म्हटले की, “कॅब ड्रायव्हरचे हे वर्तन अजिबात स्वीकारार्ह नाही.”

तथापि, ओलाने लिंक्डइन पोस्टवर सार्वजनिकरित्या कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.