महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी राज्यभरातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी महासंपर्क अभियान सुरू केले आहे. या निमित्त ते राज्यभरात विविध ठिकाणी दौरे करत आहेत. मनविसे ही महाराष्ट्रातील सर्वात प्रबळ आणि प्रभावी विद्यार्थी संघटना बनवण्याचा निर्धार अमित ठाकरे यांनी मुंबईतील प्रत्येक बैठकीत व्यक्त केला होता. दरम्यान, मुंबईत अमित ठाकरे यांच्या मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मात्र, अमित ठाकरे यांच्या या दौऱ्यादरम्यान एका चिमुकल्यासाठी एक आनंदाची गोष्ट घडली आहे. अमित ठाकरे यांनी स्वतः त्याचे आणि त्याच्या कलेचे कौतुक केल्याने हा चिमुकला भलताच खुश आहे. पार्थ घुमरे असे या मुलाचे नाव असून तो आपल्या आईबाबांसह अमित ठाकरे यांच्या बदलापूरच्या बैठकीत सहभागी झाला होता. अमित ठाकरे यांना फक्त २ मिनिटे भेटता येईल अशी इच्छा मनाशी बाळगून बैठकीला आलेल्या या मुलासोबत अमित यांनी तब्बल २० मिनिटे संवाद साधला.
पार्थ हा एक सर्वसाधारण मुलगा आहे. करोना काळात त्याला चित्रकलेची आवड निर्माण झाली आणि युट्युबवर व्हिडीओ पाहून तो स्केचिंग शिकू लागला. बघता बघता त्याचा चित्रकलेत जम बसला. आता कोणत्याही व्यक्तीचं तो अगदी हुबेहूब चित्र रेखाटतो.
कालच्या बैठकीनंतर पार्थच्या आईबाबांनी अमित ठाकरे यांना पार्थने काढलेली रेखाचित्र दाखवली. यावेळी अमित ठाकरे यांच्यासह तिथे उपस्थित असलेली सर्वच मंडळी थक्क झाली. अमित ठाकरे हे स्वतः एक रेखाचित्रकार असल्याने त्यांनी पार्थने काढलेली सर्व चित्र काळजीपूर्वक पाहिली. प्रत्येक चित्राबद्दल त्यांनी पार्थला प्रश्न विचाले आणि त्याचे कौतुकही केले.
“…तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊ”; अमित ठाकरेंचं मोठं विधान
अमित ठाकरे यांना भेटून निघत असताना, “मला राज ठाकरे यांना भेटायचं आहे” अशी इच्छा पार्थने बोलून दाखवली. या इच्छेवरही अमित ठाकरे यांनी सकारात्मक उत्तर देत म्हटलं, “नक्की. येताना तू काढलेली ही सगळी चित्रं सोबत घेऊन ये.” महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस, कीर्तिकुमार शिंदे यांनी यासंबंधीची एक पोस्ट आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केली आहे.
अमित ठाकरे यांनी १५ दिवसांत मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघातील हजारो विद्यार्थ्याशी संवाद साधला. तसेच नवीन नेमणुका जाहीर केल्या. यानंतर अमित ठाकरे सात दिवसांसाठी कोकण दौऱ्यावरही गेले होते. या सात दिवसात त्यांनी तालुका तसेच गाव पातळीवरील स्थानिक मनसे आणि मनविसे पदाधिकारी, महाविद्यालयीन तरुण-तरुणींशी संवाद साधला.