Teacher Fell asleep : भारताच्या ग्रामीण भागात शिक्षणाची दुरवस्था असल्याचे चित्र अनेकदा दिसले आहे. उत्तर प्रदेशच्या अलीगढमधील एका शाळेतील धक्कादायक प्रकार सध्या समोर आला आहे. प्राथमिक शाळेतील एका शिक्षिकेने शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याऐवजी चक्क चटई टाकून झोप काढली. फक्त झोप काढून या शिक्षिका थांबल्या नाहीत. झोपल्यानंतर उकाड्याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांकडून हाताने पंखा चालवून हवाही खाल्ली. हा सर्व घटनाक्रम कुणीतरी मोबाइलमध्ये चित्रीत केला. त्यानंतर हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
अलीगढ जिल्ह्यातील धनीपूर तालुक्यातील गोकुळपूर गावातील प्राथमिक शाळेत सदर प्रकार घडला असल्याचे बोलले जाते. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, शिक्षिका वर्गातच चटई टाकून झोपलेल्या आहेत. त्यांच्या डोक्याच्या शेजारी तीन ते चार विद्यार्थी वह्या-पुस्तकांनी त्यांना हवा घालत आहेत. आपल्या शिक्षिकेला उकाडा सहन करावा लागू नये, म्हणून या चिमुकल्यांवर ही वेळ आली.
या व्हिडीओमुळे उत्तरप्रदेशमधील शिक्षण व्यवस्थेचे अशरक्षः वाभाडे निघाले आहेत. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता सतावत आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी या शिक्षिकेवर टीका केली आहे. ज्याने हा व्हिडीओ शेअर केला. त्याने लिहिले की, जर आपल्या देशातील शिक्षकच असे असतील तर शिक्षण कसे असेल. या शिक्षिकेला उकाड्याचा त्रास होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना हवा घालण्याचे काम देण्यात आले आहे.
दरम्यान, ज्या शाळेत हा प्रकार घडला ती सरकारी शाळा असल्याचे सांगितले जात आहे. शाळेतल्याच कुणीतरी सदर व्हिडीओ चित्रीत करून तो व्हायरल केला. उत्तर प्रदेशचे शिक्षण मंत्री संदीप सिंह ज्या मतदारसंघातून येतात, त्यांच्याच मतदारसंघातील सदर व्हिडीओ असल्याचे बोलले जाते. जर शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघातीलच शाळेत शिक्षणाच्या नावाने बोंब असेल तर राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचे हाल काय असतील? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सध्या या प्रकाराची चौकशी शिक्षण विभागाकडून लावण्यात आल्याचे सांगितले जाते.