ब्रिटनच्या राजघराण्याची श्रीमंती आणि त्यांचा थाट आख्ख्या जगानं पाहिला आहे. ब्रिटनमध्ये होणाऱ्या कोणत्याही शाही कार्यक्रमात तो ठसठशीतपणे दिसून येतो. पण याचबरोबर ब्रिटनचं हे राजघराणं पर्यावरणाच्या बाबतीत देखील सजग असल्याचं नुकतंच प्रिन्स चार्ल्स यांनी बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीतून स्पष्ट झालं आहे. पर्यावरणपूरक दृष्टीकोनातून त्यांनी चक्क त्यांची विंटेज कार असलेल्या अॅस्टन मार्टिनमध्ये वाईन आणि चीजचं मिश्रण इंधन म्हणून वापरायला सुरुवात केली. याचे निष्कर्ष अॅस्टन मार्टिन स्पेशालिस्ट्सलाही आश्चर्याचा धक्का देणारे होते. कारण वाईन आणि चीजवर अॅस्टन मार्टिन आधीपेक्षाही उत्तम चालत असल्याचं स्पष्ट झालं! खुद्द प्रिन्स चार्ल्स यांनीच हा सगळा प्रयोग सांगितला आहे!
राणी एलिझाबेथनं दिली होती कार गिफ्ट!
प्रिन्स चार्ल्स हे सुरुवातीपासूनच कारप्रेमी आणि तितकेच पर्यावरणप्रेमी राहिले आहेत. त्यामुळेच त्यांच्या ताफ्यात असणाऱ्या कार्स या अधिकाधिक पर्यावरणप्रेमी कशा होतील, यावर त्यांचा भर असतो. पर्यायी इंधनासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. याचाच परिणाम म्हणून त्यांना २१व्या वर्षी राणी एलिझाबेथ दुसरी यांनी गिफ्ट दिलेली अॅस्टन मार्टिन डीबी६ त्यांनी पारंपरिक इंधनाऐवजी अपारंपरिक पर्यायी आणि पर्यावरणपूरक इंधनावर चालवण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीपासूनच प्रिन्स चार्ल्स हे अॅस्टन मार्टिनचे चाहते राहिले आहेत. आपली कार इलेक्ट्रॉनिक मोडवर कन्व्हर्ट करण्याऐवजी त्यांनी एक भन्नाट कल्पना शोधून काढली. अॅस्टन मार्टिनमधून होणारं कार्बनचं उत्सर्जन कमी करण्यासाठी त्यांनी त्यांनी चक्क इंग्लिश व्हाईट वाईन आणि चीजवर कार चालवण्याचा निर्णय घेतला.
अभियंत्यांना शंका होती, पण…
याविषयी सांगताना प्रिन्स चार्ल्स म्हणतात, “२००८मध्ये ग्रीन फ्युएल्स आणि अॅस्टन मार्टिन स्पेशालिस्ट आरएस विल्यम्स लिमिटेड यांनी एकत्रपणे वाईन आणि चीजपासून बनवलेल्या बायोइथेनॉलवर काम केलं. सुरुवातीला अभियंत्यांना या प्रयोगाविषयी शंका होती. या इंधनामुळे अॅस्टन मार्टिन या क्लासिक स्पोर्ट्स कारचं नुकसान होईल, असं त्यांना वाटलं. पण मी आग्रह धरला. जेव्हा हा प्रयोग पूर्ण झाला, तेव्हा त्यांनी देखील हे मान्य केलं की आता ही कार आधीपेक्षा जास्त चांगली चालतेय”!
२००८मध्ये कारमध्ये हा बदल केल्यानंतर द टेलिग्राफशी बोलताना प्रिन्स चार्ल्स म्हणाले होते, “असं इंधन वापरल्यामुळे तुम्ही ड्रायव्हिंग करत असताना त्याचा फार उत्तम सुगंध येतो”!