Princess Diana प्रिन्सेस डायना. हे नाव बरंच काही सांगून जातं. मुळात त्या नावामागे अशा काही गोष्टी दडल्या आहेत ज्या त्या व्यक्तीसोबतच या जगातून निघूनही गेल्या. ती व्यक्ती म्हणजे प्रिन्सेस डायना. २१ वर्षांपूर्वी पॅरिसमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात डायना यांचं निधन झालं होतं. त्या आज या जगात नसल्या तरीही त्यांची लोकप्रियता मात्र अद्यापही कमी झालेली नाही. सामान्य लोकांच्या राणी म्हणूनही त्यांना जगभरात ओळखलं जायचं. सोबतच प्रगत विचार आणि समाजाप्रती असणारी बांधिलकी जाणणारी ब्रिटनच्या राजघराण्यातील एक व्यक्ती म्हणूनही त्यांच्याकडे मोठ्या आदराने पाहिलं जायचं. किंबहुना तेच स्थान आजही कायम आहे. प्रिन्सेस डायना यांच्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर त्यांना अशा काही गोष्टी सामोऱ्या आल्या, ज्यामुळे त्या नेहमीच चर्चेचा विषय ठरल्या. मग ते त्यांचं खासगी आयुष्य असो किंवा राजघराण्यातील एक जबाबदार व्यक्ती म्हणून असणारी त्यांची महती असो. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी…
नात्यात येणाऱ्या कटुतेपासून त्या दूरच राहत-
डायना अवघ्या ९ वर्षांच्या असतेवेळी त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. हा त्यांच्यासाठी एक धक्काच होता. त्यामुळे आपण कधीही प्रेमात पडल्याशिवाय लग्न करणार नाही, अन्यथा आपल्यालाही याच प्रसंगाला सामोरं जावं लागेल असा त्यांचा समज होता. त्यांना नात्यात येणारा दुरावा, घटस्फोट या गोष्टी कधीच नको हव्या होत्या, अशी माहिती त्यांची नॅनी मॅरी क्लर्क यांनी सीएनएनशी बोलताना दिली होती.
डायना यांच्या बहिणीने एकदा प्रिन्स चार्ल्स यांना डेटही केलं होतं-
डायना जेव्हा प्रिन्स चार्ल्स यांना पहिल्यांदा भेटल्या तेव्हा त्या अवघ्या १६ वर्षांच्या होत्या. त्यावेळी डायना यांची २१ वर्षीय बहीण सारा, २८ वर्षीय प्रिन्स चार्ल्स यांना डेट करत होती, असं वृत्त ‘सिंपलमोस्ट’ने प्रसिद्ध केलं आहे.
डायना किंडरगार्डनमध्ये शिक्षिका होत्या-
प्रिन्स चार्ल्स यांच्यासोबत एन्गेजमेंट झाली त्यावेळी डायना किंडरगार्डनमध्ये शिक्षिका होत्या.
त्यावेळी डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांचा ट्रेंड-
लेडी डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांनी त्यांच्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर विविध व्यावसायिकांनी याच संधीचा फायदा उचलत एक प्रकारे मिळालेल्या संधीचं सोनं केलं. मासिकं, म्हणू नका किंवा कॅफे शॉप, सर्वत्र याच जोडीची झलक पाहायला मिळाली होती. जणू काही हा एक ट्रेंडच आला होता.
लाखोंच्या साक्षीने डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांचा विवाहसोहळा पार पडला होता-
सहसा ब्रिटनच्या शाही घराण्यातील विवाहसोहळे लंडनच्या वेस्टमिन्सटर अॅबी चर्चमध्ये पार पडतात. पण, या चर्चमध्ये पुरेशी बैठकव्यवस्था नसल्यामुळे प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना यांचा विवाहसोहळा सेंट पॉल कॅथेड्रल चर्च येथे पार पडला होता. त्यांच्या विवाहसोहळ्याला ३,५०० पाहुण्यांची उपस्थिती होती. तर, उर्वरित लाखोंच्या संख्येने हा विवाहसोहळ्या टेलिव्हीजनच्या माध्यमातून पाहत होते.
डायना यांच्या लग्नाच्या गाऊनवर १० हजार मोत्यांनी सजावट केली होती-
डायना यांच्या वेडिंग गाऊनच्याही चर्चा आजतागायत सुरुच आहेत. डायना यांचा बहुचर्चित आयव्हरी टाफेटा गाऊन हा जवळपास १० हजार मोत्यांनी सजवण्यात आला होता ज्यामुळे तो खऱ्या अर्थाने खास ठरला होता.
वाचा : प्रवासाने शिकवलेली मैत्री… माणसांशी आणि निसर्गाशी
डायना यांच्या वेडिंग गाऊनने प्रस्थापित केला रॉयल रेकॉर्ड–
प्रिन्सेस डायना यांच्या वेडिंग गाऊनने एक नवा रॉयल रेकॉर्ड प्रस्थापित केला होता. या वेडिंग गाऊनची ट्रेन २५ फूट लांब असून, ती सर्वात लांब ट्रेन ठरली.
राजघराण्यातील अनेक मानाच्या पदांच्या त्या मानकरी होत्या-
प्रिन्सेस डायना यांची विविध नावांनीही ओळख होती. प्रिन्सेस ऑफ वेल्स म्हणून त्या ओळखल्या जात होत्याच. पण, त्याशिवायही त्या डचेस ऑफ कॉर्नवल म्हणूनही ओळखल्या जायच्या. सध्याच्या घडीला डचेस ऑफ कॉर्नवॉल हे पद प्रिन्स चार्ल्स यांची सध्याची पत्नी कॅमिला यांच्याकडे आहे.
प्रत्येकजण प्रिन्सेस डायनाच्या स्टाईल स्टेटमेंटला फॉलो करत होतं-
हेअरस्टाईलपासून ते अगदी ड्रेसिंगपर्यंत प्रत्येक गोष्टीत सर्वजण प्रिन्सेस डायना यांच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचं पाहायला मिळालं होतं. जगातील सर्वात लोकप्रिय फॅशप्रिय महिलांमध्येही त्यांचं नाव घेतलं जायचं. कॅथरिन वॉकर, ख्रिस्टीयन लाक्रोइक्स, व्हर्लासे, जिम्मी चू आणि इतरही बरेच लोकप्रिय ब्रँड आणि त्यांची उत्पादनं वापरण्याला त्या प्राधान्य देत.