ब्रिटीश राजघराण्यातील सर्वात लोकप्रिय ठरलेल्या प्रिन्सेस डायना यांना जाऊन २१ वर्षे उलटली. मनमिळावू आणि बंडखोर स्वभावामुळे सर्वसमान्य जनतेच्या मनात डायना यांनी स्वत:चं ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ स्थान निर्माण केलं होतं. त्यांची लोकप्रियता खूपच अफाट होती, म्हणूनच त्यांचं निधन हे सर्वांसाठी मोठा धक्का होता.

पॅरिसमधील भीषण कार अपघातात ३१ ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला. कार अपघात झाल्यानंतर पुढच्या काही मिनिटांत त्यांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे झेव्हिअर गॉरमेलनं हे अधिकाही पहिल्यांदा घटनास्थळी पोहोचले होते. डायना यांना शेवटचं झेव्हिअर यांनी पाहिलं होतं. नुकतीच त्यांनी मिरर या वृत्तपत्राला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्या अपघातातील काही कटू आठवणी सांगितल्या.

जाणून घ्या सर्वात लोकप्रिय ठरलेल्या प्रिन्सेस डायना यांच्याविषयीच्या काही रंजक गोष्टी

‘कार अपघात अत्यंत भीषण होता. डायना यांना कसंबसं या कारमधून बाहेर काढण्यात आलं. अपघातामुळे त्यांची शुद्ध जवळपास हरपत चालली होती. बाहेर आल्यानंतर ‘काय झालं?’ एवढंच त्यांनी मला विचारलं. त्यांना तातडीनं रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं. तोपर्यंत त्या कोण आहेत याचा मला अजिबात अंदाज नव्हता. त्या ब्रिटनच्या शाही घराण्यातील सदस्या आणि प्रिन्सेस डायना आहेत हे नंतर माझ्या एका सहकाऱ्यानं मला सांगितलं. रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेईपर्यंत त्या जिवंत होत्या इतकं मला स्पष्ट आठवत होतं. त्यांनी जगावं अशी मी मनोमन देवाकडे प्रार्थना करत होतो. त्या बचावतील याची मला खात्री होती. मात्र नंतर त्यांचं रुग्णालयात निधन झालं इतकंच मला नंतर समजलं’ असं झेव्हिअर त्या मुलाखतीत सांगितलं.

या अपघातात डायना यांचे मित्र डोडी अल-फ़ाएद यांचाही मृत्यू  झाला. मात्र हा अपघात नसून घातपात होता असा आरोप डोडी अल फाएद यांच्या वडिलांनी केला होता.