Priyanka Gandhi Viral Video : मध्य प्रदेश निवडणूक प्रचारासाठी दौऱ्यावर असलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वड्रा यांचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. इंदूरमधील पक्षाच्या रॅलीनिमित्त बांधलेल्या स्टेजवर त्यांच्याबरोबर असे काही घडले; ज्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. येथे काँग्रेसच्या एका नेत्याने प्रियांका गांधी-वड्रा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले; पण तो पुष्पगुच्छ पाहून खुद्द प्रियांका गांधी यांनीही हसू आवरता आले नाही. कारण- त्यांना दिलेल्या पुष्पगुच्छात एकही फूल नव्हते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर आता खूप व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वड्रा मध्य प्रदेश निवडणुकीच्या प्रचारानिमित्त इंदौरमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यावेळी प्रचाराच्या रॅलीनिमित्त बांधलेल्या स्टेजवर त्यांचे अनेक कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते देवेंद्र यादव यांनी प्रियांका गांधी फुले नसलेला गुच्छ भेट दिला; जे पाहून उपस्थितही आश्चर्यचकित होत जोरजोरात हसू लागले. घडला प्रकार पाहून खुद्द प्रियांका गांधी-वड्रा यांनाही हसू आवरता आले नाही. तरीही प्रियांका गांधी यांनी हसत हसत तो गुच्छ स्वीकारला. त्यानंतर इतर कार्यकर्त्यांनी देवेंद्र यादव यांना पुप्षगुच्छ रिकामा असल्याचे निदर्शनास आणून दिले. या प्रकारामुळे स्टेजवर उपस्थित इतर कार्यकर्तेही काहीसे गोंधळले. पण प्रियांका गांधी-वड्रा यांनी ही घडला प्रकार फारसा मनावर घेतला नाही.

पण यावेळी सभेला संबोधित करताना त्यांनी रिकाम्या बुकेच्या मजेशीर घटनेचा संदर्भ देत भाजपावर टीकास्त्र डागले. “जसा मला फुलं नसलेला पुष्पगुच्छ मिळाला, त्याप्रमाणे मोदी सरकारची आश्वासनंही या रिकाम्या बुकेसारखी आहेत,” असं त्या म्हणाल्या.

अखेर या संपूर्ण घटनेवर काँग्रेस नेते देवेंद्र यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, पुष्पगुच्छ घाईघाईत देण्यात आला. तिथे अनेक पुष्पगुच्छ ठेवले होते आणि त्यातील एक उचलून मी त्यांना भेट म्हणून दिला; पण त्यात फुलं नसल्याचं माझ्या लक्षात आलं नाही. बहुधा या गुच्छातील फुलं पडली असतील; पण माझ्या ते लक्षात आलं नाही आणि हे चुकून घडलं.

प्रियांका गांधी सोमवारी इंदूरमधील पाच विधानसभा मतदारसंघांतील सभांना गेल्या होत्या. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सरचिटणीस सातत्याने राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी राजकीय हल्लाबोल करताना प्रियांका गांधी-वड्रा यांनी भाजप आणि शिवराज सरकारवर जोरदार हल्ला चढवला.