Father daughter Viral video: ‘श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी’ बाप-लेकीचं नातं वेगळं सांगायची गरज नाही. जगातील कुठल्याचं नात्यात जेवढी ओढ नसते तेवढी ओढ बाप-लेकीत असते. बाबा हा आपल्या मुलीसाठी काहीही करू शकतो. तो एकाच नात्यात हजारो नाती लेकीसाठी निभावत असतो. आयुष्यात कितीही मोठ्या संकटाची लाट येऊ देत, बाबा हा किनाऱ्यासारखा भक्कम उभा असतो आणि याच वडिलांच्या नजरेत जेव्हा एक मुलगी जिंकते ना, तेव्हा ती जग जिंकलेली असते. शेवटी बापाएवढं लेकीचं कौतुक कुणालाच नसतं, याचं उदाहरण म्हणून एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.
आई-वडील आपल्या मुलांना मोठं करताना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेऊन काही मुलं मात्र आई-वडिलांचं नाव मोठं करतात. सध्या असाच एक भावूक करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका मुलीनं मेहनतीच्या जोरावर तिच्यासोबतच तिच्या वडिलांचंही स्वप्न पूर्ण केलं आहे. पोलिसात भरती झाल्यानंतर या मुलीला आणि तिच्या वडिलांनी तिनं ज्या ॲकेडमीमधून शिक्षण घेतलं, तिथे बोलावण्यात आलं होतं. यावेळी तिथे मुलीबरोबरच वडिलांचाही सन्मान करण्यात आला, यावेळी वडिलांना अश्रू अनावर झाले.
हा व्हिडीओ संभाजीनगरमधला असून या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वडील आणि मुलगी समोर उभे आहेत. तेव्हा वडिलांना लेकीचं कौतुक ऐकून तिच्या यशाबद्दल, तिच्या मेहनतीबद्दल बोलताना अश्रू अनावर झाले. आपण घेतलेल्या कष्टाचं मुलीनं चीज केलं याचं समाधान वडिलांच्या चेहऱ्यावर यावेळी पाहायला मिळालं; तर वडिलांच्या नजरेत जिंकल्याचा जो आनंद आहे, तो यावेळी या मुलीनेही अनुभवल्याचं पाहायला मिळालं. बोलत असताना तिलाही भरून आलं होतं.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “अशी पिढी पुन्हा होणे नाही” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा पारंपारिक नाच; VIDEO पाहून कराल कौतुक
हा व्हिडीओ सोशल मीडियावर yoddha_academy_sambhajinagar नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत, तर नेटकरीही व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केलीय, “मुलगी वडिलांच्या नजरेत जेव्हा जिंकते ना तेव्हा ती जग जिंकलेली असते.” तर आणखी एकानं कमेंट केलीय की, “वडिलांच्या डोळ्यातील अश्रू सांगतात, संघर्ष किती मोठा होता.”