PlayerUnknown’s Battleground म्हणजेच ‘पब जी’ या ऑनलाइन मल्टीप्लेअर गेमचं सध्या सर्वच वयोगटामध्ये प्रचंड क्रेझ आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात PUBG ने धुमाकूळ घातलाय. नुकतीच हा गेम खेळणाऱ्या प्रोफेशनल प्लेयर्ससाठी PUBG Nations Cup ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत वर्ल्ड चॅंपियन बनण्यासाठी विविध देशांच्या अव्वल संघांनी आपआपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं.
दक्षिण कोरियाच्या सियोल शहरात तीन दिवस ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नऊ ऑगस्ट रोजी स्पर्धेची सुरूवात झाल्यानंतर, तीन दिवसांच्या या स्पर्धेत रशियाचा संघ पहिल्या दोन दिवसांत टॉप-2 मध्ये देखील स्थान मिळवण्यात अपयशी ठरला होता. पहिल्या दोन्ही दिवसांवर दक्षिण कोरियाच्या संघाचं वर्चस्व होतं. पण, तिसऱ्या आणि अंतिम दिवशी रशियाने जोरदार मुसंडी मारली आणि दक्षिण कोरियाला मागे टाकत थेट अव्वल स्थान गाठलं. केवळ चार गुणांच्या फरकाने दक्षिण कोरियाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. यासोबतच रशिया PUBG गेममधील पहिला वर्ल्ड चँपियन ठरला. अंतिम दिवशी देखील दक्षिण कोरियाचा संघ पहिल्या दोन फेऱ्यांनंतर आघाडीवर होता. पण अखेरच्या तीन फेऱ्यांनी स्पर्धेचं सगळं चित्र बदललं, अखेरच्या तीन फेऱ्यांमध्ये दक्षिण कोरियाच्या संघाला केवळ सात गुण मिळाले आणि त्यांची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली. पहिल्या क्रमांकावरील रशियाला 127 पॉइंट्स मिळाले, तर दुसऱ्या क्रमांकावरील दक्षिण कोरियाला 123 पॉइंट्सवरच समाधान मानावं लागलं. 106 पॉइंट्स मिळवून कॅनडाने तिसरा क्रमांक गाठला. यानंतर चौथ्या ते दहाव्या क्रमांकावर अनुक्रमे व्हिएतनाम, जर्मनी, थायलंड, चीनी तैपेई, चीन, अर्जेंटीना आणि युएसए या देशांचा क्रमांक आहे. या स्पर्धेमध्ये जगभरातील 16 देशांनी सहभाग नोंदवला आणि विजेत्याला तब्बल 500,000 डॉलर बक्षीस म्हणून देण्यात आले.
Congratulations to Team Russia, your first ever PUBG Nations Cup Champions! pic.twitter.com/ZjfYWOAxej
— PUBG Esports (@PUBGEsports) August 11, 2019
पबजी इस्पोर्ट्स या अधिकृत ट्विटर हँडलवरुन रशिया विजेता ठरल्याची माहिती देण्यात आलीये. रशियाच्या विजेत्या संघाचा फोटो शेअर करुन त्यासोबत पहिले चँपियन ठरल्याबद्दल रशियाचं अभिनंदन देखील करण्यात आलंय.