पुणे शहर जितके त्याच्या ऐतिहासिक वारसा, निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक घडामोडींसाठी प्रसिद्ध आहे तितकचं इथे राहणाऱ्या अतरंगी स्वभावाच्या पुणेकरांसाठी देखील प्रसिद्ध आहे. शुद्ध बोली आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुणेकरांची शैली आहेच तशी निराळी. म्हणूनच किमान शब्दात कमाल अपमान करणाऱ्या पुणेकरांच्या नादाला कोणी लागत नाही. तरीही कोणी नादी लागले तर त्यांना पुणेरी शैलीतच प्रत्युत्तर मिळते. अनेकदा बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्यासाठी पुणेकर त्यांची पुणेरी शैली वापरताना दिसतात. बेशिस्त लोकांना टोला लगावणाऱ्या अनेक पाट्या पुण्यात पाहायला मिळतात पण प्रत्यक्षात कोणी बेशिस्त व्यक्ती भेटला तर त्याला अद्दल घडवल्याशिवाय पुणेकर शांत बसत नाही. नियम मोडणाऱ्यांना तर पुणेकर कधीही सोडत नाही मग ते गेटसमोर पार्किंग करणारे बेशिस्त लोक असोत किंवा वाहतूकीचे नियम भंग करणारे बेशिस्त वाहनचालक असो. बेशिस्त लोकांना शिस्त लावणाऱ्या अनेक पुणेरी पाट्या सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात पण, आता बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावणाऱ्या पुणेरी काकूंचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

पुणेकरांच्या नादाला लागू नये असे म्हणतात ते उगाच नाही. पुणेकर कधीही इतरांची अरेरावी सहन करून घेत नाही, स्पष्ट शब्दात बोलतात आणि समोरच्याला त्याची चूक दाखवून देतात. अशाच एका पुणेरी काकांचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक पुणेरी काकू एका कारचालकावर संतापलेल्या दिसत आहे.

त्याचे झाले असे की, पुण्यातील काही पुलांवर चारचाकी वाहनांना बंदी आहे. दुचाकी वाहनांशिवाय इतर वाहनांना येथे प्रवेश करण्यास मनाई केली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच एका पुलावर बंदी असतानाही एक कारचालक प्रवेश करतो पण तो पुढे जाऊ शकत नाही. नियम मोडणाऱ्या या कारचालकाला एक पुणेकरी काकू अडवतात. एवढचं नाही तर त्याला खडसावून कार पुन्हा मागे न्यायला भाग पाडतात. हा प्रसंग व्हिडीओमध्ये कैद झाला आहे.

सोशल मीडियावर पुणेरी काकूंचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे.
एकाने लिहिले की, “चांगले आहे पण निर्जल माणूस परत ते करणार. ” दुसऱ्याने कमेंट केली की, “व्वा! त्या महिलेचे कौतुक. आपण इतके अधीर आणि बेपर्वा वाहनचालक झालो आहोत. वाहतूक पोलिसांना नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी लागेल, नागरिकांना शिस्त लावण्याचा हा एकमेव मार्ग आहे.”

Story img Loader