Youth Assaults Traffice Police: पुण्यातील मगरपट्टा परिसरात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला एका नशेखोर युवकानं भररस्त्यात मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. शनिवारी (दि. ११ जानेवारी) सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मारहाण केल्यानंतर स्थानिकांनी हस्तक्षेप करत सदर नशेखोर तरुणाला थांबवलं. त्यानंतर पोलिसांची सदर तरुणाला ताब्यात घेतलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण नशेत होता. मगरपट्टा येथे रस्त्यावर हुल्लडबाजी करत असताना या ठिकाणी कर्तव्य बजवात असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याला हटकले. यावेळी राग अनावर होऊन आरोपीने थेट पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांना मारहाण केली. स्थानिकांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला रोखले.

घटनेची माहिती मिळताच हडपसर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक आणि हडपसर पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचले. यानंतर त्यांनी नशेखोर आरोपीला ताब्यात घेतलं. रात्री उशीरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु होतं. आरोपीने सदर मारहाण का केली? याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान सोशल मीडियावर मात्र याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शेखर नावाच्या एका एक्स युजरने या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. “लोकांमध्ये कुठून येतो एवढा माज?”, असा प्रश्न एक्स युजरने उपस्थित केला आहे.

एक्स युजरने या व्हायरल व्हिडीओवर नाराजी व्यक्त केली.

गेल्या काही काळापासून पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याचे दिसत आहे. ४ जानेवारी रोजी आळंदी वाहतूक शाखेतील सहायक पोलिस उपनिरीक्षक अंकुश वाडेकर यांनाही एका तरुणाने मारहाण केली होती. वाहतूक पोलिसाने दंडात्मक कारवाई केली म्हणून एका ३३ वर्षीय तरुणाने वाहतूक पोलीस अंकुश वाडेकर यांच्यावर हल्ला केला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune crime news drunk youth assaults on duty traffic police accused get arrested video goes viral