Viral Video: संगीत हे भाषेपलीकडे माणसं जोडण्याचं काम करतं असं म्हणतात आणि खरोखरच याचा प्रत्येय यावा असा एक व्हिडीओ संगीतकार सलील कुलकर्णी यांनी शेअर केला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने रोटरी एक्सचेंज प्रोग्रॅममधून एक जपानी तरुणी भारतात आली होती. पुण्यात काही दिवस वास्तव्य करत असताना तिला मराठीचा असा लळा लागला की तिने चक्क एका कार्यक्रमात सलील कुलकर्णी यांचं एकटी एकटी घाबरलीस ना हे गाणं गाऊन सर्वांना थक्क केलं. विशेष म्हणजे पुणेकरांच्या समोर साजतील इतके शुद्ध उच्चार या तरुणीचे आहेत. स्वतः सलील कुलकर्णी यांनी सुद्धा हा व्हिडीओ शेअर करून या पाहुणीचे कौतुक केले आहे.
चिंटू चित्रपटातील एकटी एकटी घाबरलीस ना हे गाणं जपानी मुलीच्या आवाजात इतकं गोड वाटत आहे की पुणेकर सुद्धा तिला दाद देण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाहीत. पुण्यातील करिश्मा सोसायटी येथील हा व्हिडीओ असून या इमारतीतील रहिवाशी शीला कोपर्डे यांनी या जपानी गायिकेला या गाण्याचे शब्द शिकवले होते. गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात तिने हे गाणं सादर केलं.
विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये या तरुणीने केलेला पोशाख पारंपरिक जपानी शैलीचा आहे पण तिचे सूर, शब्द व उच्चार यामध्ये मराठीचा गोडवा जाणवतोय. तुम्ही व्हिडीओ सुरू करताच तिने म्हंटलेल्या धन्यवादमध्ये याची प्रचिती घेऊ शकाल.
जपानी गायिकेने गायलं मराठी गाणं
Video: इथे कोहलीने शतक लगावताच तिथे आजोबांनी… IND vs AFG नंतरचा सर्वात सुंदर क्षण पाहा
दरम्यान, सलील यांनी हा व्हिडीओ शेअर करताच अनेक संगीतप्रेमींनी यावर प्रतिक्रिया देत या गायिकेला शाबासकी दिली आहे. संगीतासाठी ” हे विश्वाची माझे घर ” हे आपण सिद्ध केले असे म्हणत अनेकांनी सलील कुलकर्णी यांचे सुद्धा कौतुक केले आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून कळवायला विसरू नका.