Pune Hotel Advertise Video Goes Viral: पुण्यातील गणेशोत्सव, विसर्जन मिरवणुका अनेकांच्या आवडीचा विषय असतो. पुण्यात उत्सवाचे वेगळेपण नेहमीच जपले जाते. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी फक्त राज्यातीलच नाहीत जगभरातील लोक हजेरी लावतात. शिस्तबद्ध ढोल ताशा वादन, पारंपारिक नृत्य प्रकार, मर्दानी खेळ, शिवकालीन युद्धकलांचे प्रात्यक्षिक हा या विसर्जन मिरवणुकांमधील आकर्षणाचा भाग असतो.पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूका साधारण ३० तासांहून अधिक तास चालतात, ज्याची जगभरात चर्चा होते. पुण्यातील अशाच एका गणेश विसर्जन मिरवणुकीतील एका हॉटेलबाहेरच्या जाहिरातीची सध्या जोरदार चर्चा रंगतेय. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन एका हॉटेल चालकाने भन्नाट जाहिरात करुन कमाईचा एक अनोखा फंडा शोधून काढला आहे. हॉटेल चालकाने केलेली ही जाहिरात पाहून तुम्हालाही वाटेल की, जगात पैसा आहे फक्त तो आपल्याला डोकं लावून कमवता आला पाहिजे. याच जाहिरातीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत हॉटेलच्या जाहिरातीची चर्चा
पुण्यात गणपती बाप्पाला वाजत- गाजत ढोल- ताशांच्या गजरात निरोप दिला जातो. पण पुण्यातील या विसर्जन मिरवणुकीतील सध्या एक हॉटेलची जाहिरात भलतीच चर्चेत आली आहे. जी पाहून अनेकजण पुणेकरांचा नाद खुळा, धंदा तर धंदा असतो असे म्हणत आहेत.
जाहिरातीत नेमंक काय लिहिलं आहे?
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका इमारतीच्या टेरेसवरुन अनेक लोक पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्याचा आनंद घेत आहेत. याचवेळी इमारतीच्या एका हॉटेल रुमच्या खिडकीतही काही लोक उभे आहेत, याच खिडकीच्या बाहेर एक जाहिरात लावण्यात आली होती. या जाहिरातीत लिहिले होते की, “हॉटेल तुषार, गणपती विसर्जन व्ह्यू पाहण्यासाठी टेरेसवर खुर्च्या उपलब्ध आहेत. ऑफिस – तिसरा मजला” त्यामुळे पुणेकरांच्या पुणेरी पाट्यांप्रमाणे आता ही पुणेरी जाहिरातीचीही सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्यामुळे हॉटेल मालकाने संधीच सोनं करत कमाईचा नवा फंडा शोधलेला अनेकांना चांगलाच आवडला. सध्या ही जाहिरात सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा – नाद करा पण मुंबईकराचा कुठं…! पत्नी अन् मुलांसाठी पठ्ठ्यानं एकाच वेळी खरेदी केले चक्क ५ आयफोन; बघा Video
@vidharbhacha_punekar नावाच्या एक्स अकाउंटवरुन जाहिरातीचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर लिहिलेय की, नाद खुळा, एका खुर्चीचा भाव किती होता? पुढच्या वर्षीची बुकिंग आत्ताच करुन ठेवा. दरम्यान अनेक युजर्सही हा व्हिडीओ लाईक करत त्यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका युजरने लिहिले की, मी माफी मागतो, पण पोटासाठी हे करावे लागते. दुसऱ्या युजरने लिहिले की, चांगले बिझनेस मॉडेल आहे, ड्रिंक्स आणि स्नॅक्सपण द्या. तिसऱ्या युजरने लिहिले की, धंदा तर धंदा असतो भावा, चौथ्या एका युजरने लिहिले की, अशी जाहिरात फक्त पुणेकरच करु शकतात. शेवटी एका युजरने लिहिले की, आम्ही पुणेकर काही वाया जायला देत नाही, आम्ही कचरापण विकू शकतो. पण अनेकांनी ही जाहिरात पाहून म्हटले की, यांना काय माहीत मिरवणूक बघायची मजा एका जागेवर बसून नसतेच. असं टेरेसवर बसून चेंगराचेंगरीचा फील येत नाही.