Viral video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. दरवर्षी भारतात लाखो अपघात होतात, यात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. यातील प्रत्येक अपघाताचे कारण वेगवेगळे असू शकते. यातील एक कारण खराब रस्तादेखील आहे.जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष एकमेकांशी वादविवाद करून रस्त्यांच्या देखभालीसह विकासकामं करण्याचं आश्वासन देऊन व्यापक प्रचार करतात. काही राजकीय नेते आपली आश्वासनं पाळतात, तर काही पाळतच नाहीत. रस्ता दुरुस्त करणं आणि खड्डेमुक्त ठेवणं ही कामं सरकारचीच असतात.चांगल्या रस्त्यांचा थेट फायदा सर्वसामान्यांना होत असला, तरी त्याबाबत स्वत: काही करण्याचा विचार कोणीही करत नाही. अशातच पुण्यातल्या या खड्ड्यांना वैतागून एका पुणेरी काकांनी पुण्यात अनोखं आंदोलन केलं आहे.
पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात.‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’ अशा इशार्यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. पुणे तिथे काय उणे असं म्हंटलं जातं. त्यामुळे पुणेकरांच्या नादाला लागण्याआधी लोक शंभर वेळा विचार करतात. अशाच एका पुणेरी काकांनी सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
या काकांनी पुण्यातील रस्त्यावरच्या खड्ड्यांना वैतागून तसेच रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम पाहून रस्त्यावर जागोजागी पडलेली खडी महानगरपालिकेच्या गेटवर टाकली आहे. रस्त्यावर एखादे काम झाल्यानंतर उर्वरीत खडी कर्मचाऱ्यांनी स्वच्छ केली पाहिजे होती, ती खडी हे काका पुणे महानगरपालिकेच्या गेटवर नेऊन टाकताहेत. म्हणताहेत, जो अनुभव सामान्य माणूस घेतोय तोच अनुभव आता प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा घेऊ द्या. या खडीमुळे गाड्यांची चाकं सरकतात आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. शिवाय चालताना लोकांना या खडीचा त्रास देखील होतो. पण प्रशासनाची ही जबाबदारी या काकांनी अनोख्या त्यांचा लक्षात आणून दिली आहे.
पाहा व्हिडीओ
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वर्षाला हजारो पेक्षा जास्त वाहन चालकांचा आणि प्रवाशांचा जीव जातो. रस्त्याची योग्य वेळेस डागडुजी न झाल्यामुळे पावसाळ्यात आणि इतर दिवशी देखील रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे आपल्याला पाहायला मिळतात. याच सगळ्याला कंटाळून या काकांनी अशाप्रकारे अनोखं आंदोलन केलंय.