सोशल मीडियावर एखादा मेसेज फिरू लागला की तो वाऱ्याच्या वेगाप्रमाणे पसरतो. पण त्याने पकडलेला वाऱ्याचा वेग सध्या एका अंध दाम्पत्याच्या आयुष्यात उठलेले अनपेक्षित वादळ ठरू लागले आहे. व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेल्या एका मेसेजमुळे नागरिकांनी दाम्पत्याचे जगणे मुश्किल केले आहे. धर्मा आणि शीतल लोखंडे अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या अडीच-तीन वर्षांच्या डोळस आणि गोंडस मुलीचा फोटो गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. ही मुलगी त्यांची नाही, असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. पण या व्हायरल फोटोमागील सत्य ‘लोकसत्ता ऑनलाईन’ने जगासमोर उघड केले आहे. ही मुलगी त्या दाम्पत्याचीच असल्याची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समृद्धी लोखंडे…अडीच ते तीन वर्षांची गोंडस आणि डोळस मुलगी. याच मुलीचा फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला आणि तिचे आई-वडील शीतल आणि धर्मा यांच्या आयुष्यात वादळ निर्माण झाले. खरे तर समृद्धी ही त्यांचीच मुलगी आहे. पण काही सोशल मीडियावरील स्वयंघोषित ‘जागरुक’ पहारेकऱ्यांनी ”ही लहान मुलगी पिंपरीमधील अजमेरा वसाहत येथे दिसली आहे. मात्र ज्या दाम्पत्याकडे ही मुलगी आहे, ते म्हणतात की मुलगी आमची आहे. पण ही गोष्ट पटण्यासारखी नाही. हा फोटो इतर ग्रुपमध्ये पाठवा. काय माहिती कोणाची चिमुरडी असेल त्यांना पुन्हा त्यांना भेटेल” असा मेसेज व्हॉट्सअॅपवर शेअर केला. सध्या हा मेसेज वाऱ्याच्या वेगाप्रमाणे पुणे, पिंपरी-चिंचवडसह आख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल झाला आहे. या एका मेसेजमुळे अंध दाम्पत्याला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरून जाताना ‘जागरुक’ म्हणवणाऱ्यांची ‘संशयी’ नजर त्यांना अस्वस्थ करत आहे. अनेक नागरिक तर त्यांना थेट हटकतात. यामुळे त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे.

शीतल पंडित यांचे बीड हे मूळ गाव आहे. त्या पाच-सहा वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये आल्या. अंध आणि अनाथ असल्याने निगडीतील अंध अपंग विकास या संस्थेत त्यांना स्थान मिळाले. त्यानंतर त्यांचा विवाह हा पिंपरी-चिंचवडमधील धर्मा लोखंडे यांच्याशी ६ मे २०१३ रोजी विवाह झाला. धर्मा लोखंडे यांचे शिक्षण बी. ए. पर्यंत झाले आहे. मात्र सध्या ते बेरोजगारीशी दोन हात करत आहेत. ९ जून २०१४ रोजी त्यांना गोंडस मुलगी झाली. हे त्यांच्या आयुष्यातील वास्तव असतानाही समृद्धी ही आमचीच मुलगी आहे, हे त्यांना जगाला ओरडून सांगावे लागत आहे. केवळ अंध असल्याने आणि अंगावर मळकट कपडे असल्याने ही मुलगी पळवल्याचा संशय त्यांच्यावर घेतला जात आहे. विशेष म्हणजे सात ते आठ महिन्यांपूर्वी अशाच प्रकरणाला या अंध दाम्पत्याला पुण्यातील गरवारे महाविद्यालय परिसरात सामोरे जावे लागले होते. त्यांना तेथील नागरिकांनी त्यांची मुलगी नसल्याच्या संशयावरून त्रास दिला होता. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी अंध शीतल आणि धर्मा यांना ताब्यात देखील घेतले होते. मात्र समृद्धी ही त्यांचीच मुलगी असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते, अशी माहिती अंध अपंग विकास संस्थेचे अध्यक्ष दिनकर गायकवाड यांनी दिली.

असे मेसेज पाठवताना खबरदारी घ्या!

सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. योग्य वापर होतो की नाही, हा खरे तर संशोधनाचा विषय ठरेल. व्हॉट्सअॅपवर सध्या अनेक मेसेज व्हायरल होत आहेत. अनेक जण त्याची खात्री न करता ते फॉरवर्ड करतात. पण या एका मेसेजने संबंधित व्यक्तीला त्रास होणार नाही, त्याची बदनामी तर होणार नाही ना, याचा विचार करायला हवा. या अंध दाम्पत्याचा आयुष्यात वादळ आणणारा हा मेसेज व्हायरल करणारी व्यक्ती कोण, याचा तपास पोलिसांनी लावला पाहिजे, अशी मागणी अंध अपंग विकास संस्थेने केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune pimpri photo of cute girl of a blind couple goes viral on social media