“पुणे तिथे काय उणे” म्हणत अनेक व्हिडिओ रोज सोशल मीडियावर शेअर केले जातात. पण खरचं पुण्यात खरंच असे लोक भेटतात जे इतर कुठेही भेटणार नाही. अशा अतरंगी लोकांचे अनेक किस्से देखील ऐकायला आणि पाहायला मिळतात. पुण्यात कधी काय होईल याचा नेम नाही म्हणतात ते खरंच आहे. आजकाल कोणीही, कुठेही आणि कोणत्याही कारणावरून वाद घालताना दिसतात. सध्या अशाच एका वादाचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडिओ पुण्यातील पीएमपीएमल बसमधील आहे.व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला प्रवासी आणि कंडक्टर यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरु आहे. व्हिडिओ पाहून अनेकांना राग अनावर होत आहे कारण व्हिडीओमध्ये महिलेने जी वर्तणूक केली आहे ते पाहून कोणालाही राग येईल.
पीएमपीएल बसमध्ये प्रवासी महिलेची दादागिरी
व्हायरल व्हिडीओमध्ये एका बसमध्ये एका सीटवर प्रवासी महिला बसलेली दिसत आहे. ही प्रवासी महिला समोरच्या सीटवर पाय ठेवून बसली आहे तेही पायात चप्पल घालून. हा प्रकार पाहिल्यानंतर प्रवासी महिलेला कंडक्टर पाय सीटवरून खाली ठेवण्याची विनंती करतो. पण महिला त्याला अजिबात जुमानत नाही. उलट त्याच्याबरोबर वाद घालते.
व्हिडीओमधील संभाषण
महिला : प्रत्येकाला बोलायचे
कंडक्टर : तुम्ही सीटवर पाय मांडल्यावर लोक काय म्हणणार? लोक बोलणारचं ना, असे कसे चालेल. ते पाय सीटवर ठेवू नका, पाय खाली ठेवा मावशी. पाय खाली घ्या
महिला : प्रत्येकाला बोलायचे
कंडक्टर : प्रत्येकाने प्रत्येकाचे ठरवायचे
महिला : काढ तू, फोटो काढ, व्हिडिओ काढ, काहीही कर.
कंडक्टर : पाय खाली घ्या
महिला : नाही घेणार
कंडक्टर : नाही तर पुढच्या स्टॉपला उतरा
महिला : नाही उतरणार
कंडक्टर : मग पाय खाली घ्या, सीटवर पाय नाही ठेवायचे, ती बसण्याची जागा आहे.
असा वाद सुरुच राहतो पण प्रवासी महिला काही शेवटपर्यंत ऐकत नाही.
एक्सवर @avaliyapravasi नावाच्या खात्यावर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, स्थळ : PMPML, पुणे. असे नमुने इथंच भेटतात.”
व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
काकूंचा हट्टीपणा पाहून नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला.
एकाने लिहिले की,”या सगळ्यात चालक आणि कंडक्टर यांनाच त्रास होतो. सहप्रवासी कंडक्टरकडे तक्रार करणार आणि जनता कंडक्टरसाहेब यांच्याशी उद्धट वर्तन करणार. एक तर पगार कमी, त्यात जनता असली आणि त्यात पुणे….खरंच पीएमपीएलमध्ये काम करणाऱ्या ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना सलाम”
दुसऱ्याने कमेंट केली की,”ह्या ताईच्या घरी जावून ह्यांचा सत्कार करावा. कारण ह्यांना वाटत की सरकारी मालमत्ता ह्याचीच आहे.”
तिसऱ्या कमेंट केली की,सध्या सारासार विवेकबुद्धी (common sense) आणि आपले सार्वजनिक ठिकाणी वर्तणूक ह्या गोष्टी लुप्त पावत आहेत. माणसाला आपण केलेल्या चुकांची जाणीव असूनही त्या चुकांच्या दंडाची काहीही भीती उरलेली नाही. परिस्थिती अवघड होत चालली आहे.
चौथ्याने कमेंट केली की,” हे असले नमुने आहेत म्हणून एक पण सरकारी सार्वजनिक वाहतूक सेवा ठीक नाही, सुंदर नाही. असले लोक ओझं आहेत देशावर. असल्या लोकांना मोठा आर्थिक दंड, शिक्षा, सार्वजनिक वाहतूक सेवांचा लाभ घेता येणार नाही, अशी तात्पुरती बंदी घालावी. त्याच्यावर कार्यवाही होत नाही म्हणून त्याचे फावते.