Pune Porche Car Accident Viral Post: पुण्यातील पोर्श कारच्या अपघात प्रकरणाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. १७ वर्षांच्या आरोपीने बेजबाबदारपणे गाडी चालवताना दोघांची हत्या केल्याचे हे प्रकरण मूळ घटनेइतकेच त्यानंतर झालेल्या सारवासारवीच्या प्रयत्नांमुळे जास्त चर्चेत आले आहे. सुरुवातीला अल्पवयीन म्हणून बाल न्यायालयाने आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली होती, या शिक्षेवर देशभरातुन प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता. कुणाच्या जीवाची किंमत ही इतकी स्वस्त असू शकते का असा प्रश्न करत लोकांनी जाब विचारला होता. यानंतर घडणारा एक एक प्रकार या घटनेला वेगळे वळण देत गेला, अचानक आरोपीसारख्या दिसणाऱ्या तरुणाचा रॅप व्हिडीओ व्हायरल होणं,त्यात त्याने निर्लज्जपणे आपण केलेल्या गुन्ह्याबाबत बढाया मारणं, नंतर आरोपीच्या आईने माध्यमांसमोर येऊन पोलिसांना विनवणी करत आपल्या मुलाच्या सुरक्षेसाठी रडणं, हे सगळे प्रकार या घटनेला आणखीनच चिघळत गेले. या सर्व प्रयत्नांवर रोज वेगवगेळ्या स्वरूपात टीका होतच आहे. अशातच मुंबई पुणे एक्सस्प्रेसवेवर धावणाऱ्या एका गाडीच्या मागे लावलेल्या पोस्टरला नेटकऱ्यांनी तुफान व्हायरल केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकांच्या Whatsapp Status वर शेअर होत असणाऱ्या या फोटोमध्ये मुंबई पुणे एक्सस्प्रेसवे वर धावणारी एक कार दिसत आहे. या कारच्या मागील काचेला एक साधा कागद अत्यंत मार्मिक टोला देत चिकटवण्यात आला आहे. यावर लिहिलंय की, “कृपया सुरक्षित अंतर राखा, अगदी तुम्हाला ३०० शब्दांचा निबंध लिहिता येत असेल तरी..” हा फोटो व्हायरल होताच अनेकांनी आपल्या प्रोफाईल्सवर सुद्धा शेअर केला आहे. पुणेकरांनी व्यक्त केलेला अनोखा संताप अशा कॅप्शनसहित ही सूचना व्हायरल होत आहे.

केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर अनेक कलाकारांनी सुद्धा आरोपीला सुनावलेल्या ३०० शब्दांच्या निबंधलेखनाच्या शिक्षेवर खरमरीत टीका केली होती.

पुणेकरांनी व्यक्त केला संताप, अनोखी पोस्ट व्हायरल (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

दुसरीकडे, सध्या या प्रकरणात अल्पवयीन आरोपी, त्याचे वडील आणि आजोबा सध्या अटकेत आहेत. पण या प्रकरणात आरोपीच्या आईचाही समावेश असल्याची बाब समोर आली आहे. १७ वर्षीय आरोपीच्या आईने मुलाचे रक्त नमुने बदलण्यासाठी स्वतःचे रक्त ससून रुग्णालयाला दिले असल्याचे पोलिसांमधील सूत्रांनी सांगितले आहे. ज्यावेळी रक्त चाचणी घेण्यासाठी नमुने घेतले गेले, तेव्हा आरोपीची आई रुग्णालयात हजर होती. डॉ. अजय तावरे आणि डॉ. हळनोर यांच्या अटकेनंतर आरोपीची आई बेपत्ता झाली आहे व पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune porche car accident viral poster stick to running car on mumbai pune express way people trolling police for agrawal 300 words essay punishment svs