Pune Girl Floating In Air Viral Video: एखाद्या हॉरर चित्रपटातील सीन वाटावा असा काहीसा प्रकार पुण्यातील एका शाळेत घडल्याचे सांगणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. बघताक्षणी धडकी भरवणारी अशी ही क्लिप कितपत खरी आहे याबाबत सोशल मीडियावर नेटकरी चर्चा करत आहेत. साहजिकच या प्रकारामुळे ऑनलाईन गोंधळ चालू असल्याचे दिसतेय. असं नेमकं पुण्याच्या शाळेत घडलं तरी काय चला पाहूया..
पुण्याच्या शाळेतील असल्याचे सांगून व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक शाळकरी मुलगी वर्गात अर्धवट हवेत तरंगताना दिसतेय. मुलगी बेशुद्ध अवस्थेत आहे, तिचे वर्गमित्र तिला सांभाळण्याचा प्रयत्न करत असताना तिचं तिच्या शरीरावर अजिबातच नियंत्रण नसल्याचं दिसतंय. ‘सुहित_जाधव’ या वापरकर्त्याने Reddit वर शेअर केलेल्या, पोस्टमध्ये, “आज माझ्या शाळेतील एक मुलगी भूतबाधा झाल्याप्रमाणे हवेत तरंगत होती” अशा आशयाचे कॅप्शन लिहिले आहे. साहजिकच काहीच तासांमध्ये हा व्हिडीओ ऑनलाईन तुफान व्हायरल झाला होता.
अनेकांनी ही आपत्कालीन वैद्यकीय स्थिती असल्याचे म्हणत यामागे भूतबाधा वगैरे असल्याचे दावे फेटाळून लावले आहेत. तिला बाकावरून उठता येत नव्हते किंवा ती उठण्याचा प्रयत्न करताना तिचं संतुलन जात होतं म्हणून कदाचित ती हलतेय हे बघून तरंगतेय असा भास होत असावा. अशी शक्यता काहींनी वर्तवली आहे. काहींनी असाही अंदाज लावला की ती ज्या बाकावर बसली होती त्याचाच आधार घेऊन उठतेय. पायाने आधार घेत असताना पुढे असलेल्या दुसऱ्या बाकामुळे आपल्याला नीट दिसत नसावं. तर काहींनी हा व्हिडीओ पूर्णपणे ठरवून केलेला असावा व ती मुलगी अभिनय करतेय अशीही शक्यता वर्तवली आहे.
नेमकं हे प्रकरण कुठल्या शाळेतील आहे याबाबत स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही.
हे ही वाचा<< सीता रामाच्या मंदिरात चिकनचं दुकान, राहुल गांधींकडून उद्घाटन? Video वर प्रचंड संताप, घटनेचं खरं मूळही भीषण
(टीप: वरील लेख हा व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही. लोकसत्ता. कॉम या व्हिडीओच्या सतयेतेची पुष्टी करत नाही)