Viral Video : गेल्या काही महिन्यांमध्ये सोनसाखळी चोरट्यांचा उच्छाद वाढलेला दिसून येत आहे. गर्दीच्या ठिकाणी, सार्वजानिक कार्यक्रमात तसेच दिवसाढवळ्या रस्त्यावर महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या घटना कॅमेरऱ्यात कैद झाल्या आहेत. साखळीचोरांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातील कर्वे नगर भागात दिवसाढवळ्या एका वृद्ध महिलेच्या अंगावरील मंगळसुत्र चोरट्यांनी लंपास केले. या घटनेचा सीसीटिव्ही फुटेजचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (pune video Chain Snatcher Drags Elderly Woman, Steals Mangalsutra shocking video viral)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन वृद्ध महिला रस्त्याच्या एका बाजूने पायी चालताना दिसत आहे. अचानक त्यांच्या मागून एक दुचाकीस्वार येतो आणि दोघीपैकी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र ओढतो. तो इतक्या जोराने मंगळसुत्र ओढतो की ती महिला खाली पडते. त्यानंतर चोर तिथून निघून जातो पण नंतर त्याच्या लक्षात येते की मंगळसुत्राचा अर्धा तुटलेला भाग त्याच ठिकाणी खाली पडला त्यामुळे तो पुन्हा येतो आणि उर्वरित मंगळसुत्र उचलून घेऊन जातो पण या दोन्ही वृद्ध महिला काहीही करू शकत नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
Archana More-Patil या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “शहरात मंगळसूत्र चोरांचा सुळसुळाट. कर्वेनगरमध्ये आज सकाळी जेष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेले. हिसकवताना अर्धा भाग तुटून खाली पडला, चोरटा बिनधास्त मागे आला, पडलेला भाग उचलून नेला. ना कोणाचे भय..ना कायद्याचा धाक. शहरातील पोलीसांचे अस्तित्व कमी होत चाललेय”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “इतक्या राजरोसपणे, कठीण आहे…” तर एका युजरने लिहिलेय, “कर्वेनगर भागात गेल्या चार दिवसात अशाच तीन चार घटना घडल्या. महिलांना रस्त्यावर फिरणे अवघड झाले आहे…” आणखी एका युजरने लिहिलेय, “पोलिसांची आणि कायद्याची भीती राहिली नाही”