Empty Crowd Free Tulsi Baug : तुळशीबाग हे पुण्यातील अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे. खरेदी करायची इच्छा झाली की पुणेकरांना तुळशीबागेत जायचा मोह आवरत नाही. या तुळशीबागेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे, घरगुती वस्तू, चप्पल, इमिटेशन दागिने, धातूच्या वस्तू, खेळणी अगदी कमी दरात मिळतात.
तुम्ही तुळशीबागेत अनेकदा गेला असाल किंवा काही लोकांनी तुळशीबागचे फोटो पाहिले असतील तर तुम्हाला तुळशीबागमध्ये प्रचंड गर्दी दिसली असेल. तुम्ही गजबजलेली तुळशीबाग पाहिली पण कधी रिकामी तुळशीबाग पाहिली का? हो, रिकामी तुळशीबाग.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक रिकामी तुळशीबाग दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (do you see empty Crowd free Tulsi Baug market area in pune)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुळशीबागचा परिसर दिसत आहे. सुरूवातीला तुम्हाला हा तुळशीबागचा परिसर ओळखता येणार नाही कारण हा नेहमीपेक्षा वेगळा दिसतोय. गर्दीमय असलेली तुळशीबाग रिकामी आणि मोकळी दिसतेय. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हे दृश्य खूप दुर्मिळ आहे. व्हिडीओमध्ये तुळशीबागचा संपूर्ण परिसर दाखवला आहे. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कशी वाटतेय मोकळी तुळशीबाग”
पाहा व्हायरल व्हिडीओ
punekar2.0_og या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तुळशीबाग ची पहिल्यांदा जमीन पाहिली” तर एका युजरने लिहिलेय, “तुळशीबागेला गर्दी शिवाय शोभा नाही ” तर एका युजरने लिहिलेय, “असे शांत पाहून मनाला व तुळशी बागेला पण समाधान वाटले असेल” एक युजर लिहितो, “सकाळी सकाळी काढलेला व्हिडीओ आहे हा” एका युजरने मिश्किलपणे विचारलेय, “पुरुष मंडळी कोणाला असे वाटते की सोमवार ते रविवार सकाळी 7 पासून रात्री 12 पर्यंत असेच बंद असावे.” या व्हिडीओवरील काही युजर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही.
तुळशीबाग नाव का व कसे पडले?
तुळशीबाग या नावामागे श्रीमंत नारो आप्पाजी खिरे यांचा खूप मोलाचा वाटा आहे. लेखक सुप्रसाद पुराणिक यांनी ‘नावामागे दडलंय काय?’ या पुस्तकात सांगतात, “गुरुवार पेठ या परिसरात त्यावेळेस अनेक बागा होत्या. नारो आप्पाजीनी सरदार खाजगीवाल्यांच्या बागेतील एक एकराचा तुकडा घेऊन तेथे राम मंदिर बांधायचे ठरविले. बागेच्या त्या तुकड्यावर तेव्हा तुळशीची बाग होती. म्हणून या देवळाच्या परिसराला नाव पडले ‘तुळशीबाग’. त्यामुळे या परिसराला तुळशीबाग म्हणतात. या ठिकाणी आता विविध दुकाने वाढलेली आहेत त्यामुळे आता ही जागा फक्त राम मंदिरासाठी नाही तर बाजारपेठ म्हणून सुद्धा ओळखली जाते.