पुण्यातील रिक्षांसाठी उबरच्या नवीन भाडे धोरणामुळे वापरकर्त्यांमध्ये निराशा पसरली आहे. १ एप्रिलपासून, अॅपवर दाखवले जाणारे भाडे हे अंदाजे भाडे असेल आणि अंतिम भाडे मीटर रीडिंगद्वारे निश्चित केले जाईल. याचा अर्थ असा की प्रवाशांना सुरुवातीला दाखवलेल्य अंदाजे भाड्याऐवजी मीटरनुसार निश्चित केलेले भाडे द्यावे लागेल. अनेक पुणेकर या बदलावर नाराज आहेत, त्यांना वाटते की यामुळे अनपेक्षित आणि संभाव्यतः जास्त भाडेवाढ होईल. दरम्यान याचबरोबर. पुण्यातील उबर रिक्षाचालक आणि स्थानिक रिक्षावाल्यांमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
अलीकडेच, एका स्थानिक रिक्षावाल्याचा उबर रिक्षाचालक आणि एका प्रवासी महिलेला त्रास देण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, महिलेने तिच्या मुलीला शाळेतून घेण्यासाठी उबर रिक्षा बुक केली होती. रिक्षा सोसायटीच्या लॉबीमध्ये पोहोचताच, एका स्थानिक रिक्षावाल्याचा अचानक आला आणि त्यांचा रस्ता अडवला. त्याने महिलेला तिची उबर राईड रद्द करून ऑटोमधून उतरण्याची मागणी केली. उबर चालकाने त्याला विरोध केला तेव्हा रिक्षावाल्यानं त्याला धमकी दिली आणि राईड रद्द करून गाडी बाजूला पार्क कर असे म्हणाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला. अशाच घटनेचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात काही स्थानिक रिक्षाचालक उबर रिक्षा चालकाला धमकावत आहे.
अशाच दुसऱ्या घटनेत, रामवाडी मेट्रो स्टेशनजवळ स्थानिक रिक्षावाल्यांच्या गटाने उबर रिक्षा चालकाला धमाकावत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडिओ शेअर करणाऱ्या एका रेडिट वापरकर्त्याने लिहिले की, “मी रामवाडी मेट्रोजवळ होतो आणि वरून हे चित्रीकरण केले. मुळात, ते इतर रिक्षाचालकांना कोणतेही अॅप वापरू नये यासाठी भाग पाडत आहेत. हे गुंड इतरांना धमकावत राहतात आणि एकाच्या हातात काठी देखील होती. लोकांनी त्यांच्याबरोबर प्रवास करण्याऐवजी चालणे जाणे पसंत केले यात आश्चर्य नाही. मी ₹१०० जास्त दिले आणि कॅब घेतली. या गुंडांसह तुम्हाला सुरक्षित वाटू शकत नाही.”
नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
पोस्टवर कमेंट करताना, नेटिझन्सनी सांगितले की,”रिक्षाचालकांना सार्वजनिक वाहतुकीकडे वळून धडा शिकवला पाहिजे.”
“लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की त्यांनी रिक्षा वापरणे थांबवावे आणि कॅब, बसेस वापरण्यास सुरुवात करावी किंवा स्वतःची दुचाकी वाहने घ्यावीत. या गुंडांना पैसे देणे थांबवा नाहीतर तुम्हाला अशीच वागणूक मिळत राहील,” एका वापरकर्त्याने टिप्पणी केली.
“पीएमपीएमएल आणि मेट्रो हे यावर एकमेव उपाय आहेत,” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले.
“त्यांना धडा शिकवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सार्वजनिक वाहतूक किंवा कॅब वापरणे,” तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले.
दरम्यान, उबरचे नवीन भाडे धोरण मार्चच्या अखेरीस लागू झाले. त्यानुसार, उबर अॅपवर प्रदर्शित केलेले भाडे केवळ सूचक आहे आणि प्रवाशांनी दिलेली प्रत्यक्ष रक्कम मीटर रीडिंगवर आधारित आहे. पूर्वी, प्रवासी अॅपच्या निश्चित किंमतीवर अवलंबून होते, ज्यामुळे पारदर्शकता दिसून येत होती. नवीन प्रणाली अंतर्गत, रिक्षाचालक आता अॅपमध्ये दर्शविलेल्या भाड्याने बांधील नाहीत.