आपण आपल्या दैनंदिन जीवनात इतके व्यस्त असतो की कधी कधी आपल्या आजूबाजूला काय चालले आहे हे पाहायला देखील आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो. पण थोडा वेळ थांबून एक नजर जरी मारली तर लक्षात येईल की रस्त्यात अशी अनेक माणसे असतात की ज्यांना मदतीची खूप गरज असते पण आजूबाजूच्या लोकांना त्याच्याकडे बघायलाही वेळ नसतो. असाच काहीसा अनुभव पुण्यातल्या एका वयोवृद्ध सुरक्षा रक्षकाला देखील आला. कित्येक तास ते काहीतरी शोधत होतो. डोळ्या पाणी आणि वस्तू चोरीला गेल्याचे दु:ख हे त्यांच्या चेह-यावर दिसत होते. पण कोणालाच त्यांना महत्त्व द्यावे असे वाटले नाही.
त्याचा हा त्रास एक महिला पाहत होती. तिने लगेच एक फेसबुक पोस्ट टाकली आणि तिच्या या पोस्टची दखल नेटीझन्सने घेतली. पुण्यातल्या एटीएमच्या बाहेर कार्यरत असलेल्या एका वृद्ध सुरक्षारक्षकाची सायकल कोणीतरी चोरून नेली. त्यामुळे दु:खी झालेल्या या सुरक्षारक्षकाने आजुबाजूच्या परिसरात सायकल शोधली त्यांना काही सायकल मिळेना. त्यामुळे डोळ्यात पाणी आणून एका ठिकाणी हशातपणे ते बसून होते. या ठिकाणी राहणा-या तन्वी जैन या महिलेने वृद्ध सुरक्षारक्षकाला पाहिले. त्यांचा फोटो काढून तिने तो फेसबुकवर टाकला. सोबत पुणेकरांना तिने मदतीचे आवाहन देखील केले. या वृद्ध माणसाची सायकल चोरीला गेली आहे. त्यामुळे जर कोणाकडे एखादी सायकल असेल आणि त्यांना ती दान करायची असेल तर आपल्याशी संपर्क साधण्याची विनंती तिने फेसबुक पोस्टद्वारे केली. तिच्या या विनंतीला पुण्यातील अनेक तरुण तरूणींनी भरभरून प्रतिसाद दिला. तीन दिवसांतच या वृद्ध सुरक्षारक्षकाला नवीन सायकल मिळाली. नवीन सायकल मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावरून ओसंडून वाहत होता. या महिलेने याचा व्हिडिओ देखील फेसबुकवर टाकला. कधी कधी आपली छोटीशी मदत देखील एखाद्याच्या आयुष्यात किती आनंद आणू शकते हे तन्वीने दाखवून दिले.
एका फेसबुक पोस्टमुळे ‘त्यांना’ सायकल मिळाली
वृद्ध सुरक्षारक्षकाची सायकल चोरीला गेली होती
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 07-10-2016 at 16:26 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune woman brings the internet together to buy atm security guard new bicycle