प्रवासादरम्यान महिलांची प्रसूती झाल्याच्या अनेक घटना आपण वाचल्या असतील. अशा कसोटीच्या काळात गर्भवती महिलेची प्रसूती करण्यासाठी इतर प्रवासी मदतीसाठी धावून येतात. अनेक विमानसेवा दिलदारपणे प्रवासादरम्यान जन्मलेल्या नवजात बाळाला मोफत विमान प्रवासाची अमूल्य भेटही देतात. नुकताच पुण्यातील एका महिलेने ओला कॅबमध्ये गोंडस बाळाला जन्म दिला. ही गोष्ट कंपनीला कळताच त्यांनी महिलेच्या कुटुंबाला पाच वर्षे मोफत प्रवासाची सेवा भेट म्हणून दिली.
वाचा : रोहिंग्याविरोधात व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या सौंदर्यवतीवर किताब गमावण्याची वेळ !
पुण्याच्या कोंढवा भागात राहणारी ईश्वरी सिंग ही महिला आपल्या सासूसोबत तपासणीसाठी डॉक्टरांकडे निघाली होती. तिने ओला बुक केली. पण रुग्णालयात पोहोचण्याआधीच वाटेतच तिला प्रसूती वेदना सुरु झाल्या. ओला कॅबचे ड्रायव्हर यशवंत गलांडे यांच्यासाठीही हा कसोटीचा क्षण होता. कारण हॉस्पिटल पाच किलोमीटर दूर होतं. पुण्याच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत तात्काळ हॉस्पिटलला पोहोचणं गरजेचं होतं. मात्र, ईश्वरी वाटेत प्रसूत झाल्या. काही वेळातच यशवंत गलांडे यांनी किशोरीला पुणे महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयात सुखरुप पोहोचवलं.
वाचा : प्रेरणादायी! IITमधील नोकरी सोडून अवलियाचे आदिवासी पाड्यात काम!
बाळ आणि बाळांतीण दोघंही सुखरुप आहे. दरम्यान, समयसूचकता दाखवत महिलेला सुखरूप रूग्णालयात पोहोचवल्याबद्दल यशवंत गलांडे यांचेही कौतुक होत आहे. यशवंत गलांडे यांनी ही माहिती ओला कंपनीला दिली तेव्हा खुश होऊन कंपनीने या ईश्वरी आणि तिच्या कुटुंबियांना पाच वर्षांसाठी मोफत सेवा देऊ केली आहे. त्याचप्रमाणे यशवंत यांचे देखील ओलाने आपल्या फेसबुक पेजवर आभार मानले आहेत.