साउथ सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचं सकाळी जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. बंगळुरू इथल्या विक्रम रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ४६ वर्षांच्या अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी झपाट्याने पसरली आणि सर्वजण हळहळले. अनेक कलाकारांना आणि चाहत्यांना त्यांच्या लाडक्या अभिनेत्याचे असे अचानक निघून जाण्याने मोठा धक्का बसला आहे. मनोरंजन विश्वावर तर शोककळा पसरली आहे. सुपरस्टार पुनीत राजकुमार काही दिवसांपूर्वीच केजीएफ स्टारसोबत शिवराजकुमार यांच्या बजरंगी २ च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. यावेळी पुनीत राजकुमारने यशसोबत धमाकेदार डान्स परफॉर्म केला होता. तेव्हा कुणाला असं वाटलं देखील नव्हतं की हा पुनीत राजकुमारचा शेवटचा परफॉर्मन्स असेल…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुपरस्टार पुनीत राजकुमार यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांचे जुने फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ते शेअर करून पुनीत राजकुमारचे चाहते त्याला आदरांजली वाहत आहेत. या व्हिडिओमध्ये पुनीत राजकुमारचा शेवटचा व्हिडीओ देखील आहे. केजीएफ स्टार यश, शिवराजकुमार आणि पुनीत राजकुमार यांचा ‘बजरंगी २’ च्या टायटल ट्रॅकवर डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये हे तिन्ही कलाकारांनी त्यांच्या शानदार डान्स मूव्ह्जने डान्स फ्लोवरवर धमाल उडवली होती. या व्हिडीओमध्ये तिन्ही कलाकारांमधली घट्ट मैत्री स्पष्टपणे झळकून येतेय. जवळपास २ वर्षांनंतर एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेला केजीएफ स्टार यश सुद्धा या क्षणी भावूक झाला होता. हा व्हिडीओ पाहून सर्वांचेच डोळे पाणावत आहेत.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, डान्स फ्लोअरवर एकत्र डान्स केल्यानंतर सुपरस्टार पुनीत राजकुमार यांनी केजीएफ स्टार यशला एक जादू की झप्पी सुद्धा दिली होती. त्यानंतर शिवराजकुमार यांच्याशी हात मिळवत त्यांना सुद्धा जादू की झप्पी दिली. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर खळखळून हास्य फुलताना दिसून येत होते.

आज सकाळी सुपरस्टार पुनीत राजकुमार यांच्या छातीत दुखू लागल्याने पुनीतला बंगळुरूच्या बिक्रम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. पुनीत यांनी २९ हून अधिक कन्नड चित्रपटांमध्ये काम केलंय आणि लोकांची मनं जिंकली आहेत. ते ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांचे पुत्र होते.

पुनीत राजकुमार यांनी आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. १९८५ मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. एवढंच नाही तर कर्नाटक राज्य पुरस्कारात सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कारही त्यांनी पटकावला. पुनीत यांना ‘अभि’, ‘वीरा कन्नडिगा’, ‘अजय’, ‘अरसू’, ‘राम’, ‘हुदुगारू’ आणि ‘अंजनी पुत्र’ यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी कायम आठवणीत ठेवलं जाईल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Puneeth rajkumar last video dance with kgf star yash and shivarajkumar showed unique style event bajrangi 2 video viral prp