Punekars New Year Resolution Video : नवीन वर्ष २०२५ चे सर्वांनीच मोठ्या उत्साहात, थाटामाटात स्वागत केले. जुन्या वर्षातील कटू-गोड आठवणींना निरोप देत नव्या वर्षात प्रवेश केला. नववर्षात तुमच्यापैकी अनेक जण वेगवेगळे संकल्प करतात. त्यामध्ये वजन कमी करणे, योग करणे, बचत करणे, बाहेरचे खाणे टाळणे, वाचन वाढवणे, डायरी लिहिणे, प्रवास करणे, अशा संकल्पांचा समावेश असतो. त्यात अनेक तरुण फिट राहण्यासाठी जिमला जाण्याचा संकल्प करतात. हा संकल्प असा असतो की, सुरुवात तर होते; पण तो शेवटपर्यंत पूर्ण होतोच, असे नाही. पण, एका पुणेकर तरुणाने जिमला जाण्याचा संकल्प केला आणि तो खूप मनावरही घेतला. त्यानंतर ३१ डिसेंबर २०२४ च्या रात्री १२ वाजता त्याने भररस्त्यात लोकांच्या गर्दीमध्ये असं काही केलं की, ते पाहून तुम्हालाही हसू येईल. सध्या सोशल मीडियावर पुणेकर तरुणाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
नववर्षाचा संकल्प असावा तर असा
पुण्यातील एफसी रोडवर मोठ्या संख्येने तरुणाईने एकत्र येत नवीन वर्षाचे स्वागत केले. मात्र, यावेळी जमलेल्या गर्दीत एक तरुण मात्र भाव खाऊन गेला. या तरुणाने भरगर्दीत असे काही केले की, ते पाहून उपस्थित लोकही हसू लागले. या तरुणाने भररस्त्यात उभ्या असलेल्या लोखंडी स्टेजवर चक्क व्यायाम सुरू केला. सर्व जण रात्री १२ वाजता नववर्षाचे स्वागत करीत असताना हा तरुण मात्र चक्क व्यायाम करत होता. त्यामुळे अनेक जण नववर्षाचा संकल्प असावा तर असा, असे म्हणताना दिसतायत.
व्हिडीओत तुम्ही पुण्यातील एफसी रोड पाहू शकता, जिथे नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने तरुणाई एकत्र आली आहे. फोटो, सेल्फी व व्हिडीओ काढताना दिसतायत. गर्दी इतकी आहे की, अनेक जण रस्त्यावरील लोखंडी स्टेजवर उभे आहेत. इतर सर्व नववर्षाच्या जल्लोषात रमले असताना हा तरुण मात्र त्यातीलच एका स्टेजवर उभा राहून चक्क व्यायाम करताना दिसतोय. ज्याला पाहून उपस्थित तरुणाईदेखील हसतेय. कारण- अशा प्रकारे रस्त्यात जिम कोण करतं भावा, असा प्रश्न त्यांना पडलाय. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर म्हटले की, भावाने १ जानेवारी २०२५ पासून जिम सुरू करणार हे फारच मनावर घेतलं आहे वाटतं. म्हणूनच तो ३१ डिसेंबर २०२४ च्या रात्री १२ वाजताच जिम करू लागला.
३१ डिसेंबर २०२४ च्या रात्री १२ वाजताच करू लागला जिम
पुणेकर तरुणाचा हा मजेशीर व्हिडीओ marathi_memer_2.0 या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर युजर्सही मजेशीर कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिले की, भावाला १ जानेवारीला जिम लावायची होती; पण दुसऱ्या दिवशी जाग आली नाही तर..ं. दुसऱ्या एकाने लिहिले की, पुणे आहे इथं काहीपण होऊ शकतं. शेवटी एकाने लिहिले की, २०२५ मध्ये महाराष्ट्र केसरी होणार हा. काहींनी मजेशीर कमेंट्स केल्या असल्या तरी अनेकांना तरुणाचे असे वागणे अजिबात आवडलेले नाही. पुण्याची पुण्याई घालवली, असे म्हणत अनेक जण त्याच्या वागण्यावर संताप व्यक्त करीत आहेत. पण, हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटतं, ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा.