पुणे शहर जितके त्याच्या ऐतिहासिक वारसा, निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक घडामोडींसाठी प्रसिद्ध आहे तितकचं इथे राहणाऱ्या अतरंगी स्वभावाच्या पुणेकरांसाठी देखील प्रसिद्ध आहे. शुद्ध बोली आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुणेकरांची शैली आहेच तशी निराळी. म्हणूनच किमान शब्दात कमाल अपमान करणाऱ्या पुणेकरांच्या नादाला कोणी लागत नाही. तरीही कोणी नादी लागले तर त्यांना पुणेरी शैलीतच प्रत्युत्तर मिळते. नियम मोडणाऱ्यांना तर पुणेकर कधीही सोडत नाही मग ते गेटसमोर पार्किंग करणारे बेशिस्त लोक असोत किंवा वाहतूकीचे नियम भंग करणारे बेशिस्त वाहनचालक असो. बेशिस्त लोकांना शिस्त लावणाऱ्या अनेक पुणेरी पाट्या सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात पण, आता बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावणाऱ्या पुणेरी काकूंचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
पुण्यात वाहतूकीचे नियम सर्रासपणे मोडले जातात. कोणी नो पार्किंगमध्ये गाडी पार्क करते तर कोणी थेट पदपथावर गाड्या चढवतात. पदपथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी तयार केलेले असतात हे माहित असूनही अनेक बेशिस्त पुणेकर बिनधास्तपणे पदपदावरून दुचाकी घेऊन जाताना दिसतात. एवढचं काय पदपथावर चालणाऱ्या पादचाऱ्यांना कर्कश हॉर्न वाजवून बाजू हटण्यास सांगतात. अशा बेशिस्त वाहनचालकांना एका पुणेरी काकूंनी चांगलीच अद्दल घडवली आहे. व्हिडीओ पुण्यातील एका पुलावरील आहे जिथे पादचाऱ्यांसाठी अगदी छोटा पदपथ आहे. रस्त्यावरून दुचाकींना जाण्यासाठी जागा असूनही बेशिस्त दुचाकीचालक या छोट्याशा पदपथावरून जात आहे. एक दुचाकीस्वार पदपथावर शिरला की, सगळे त्याच्या मागेच शिरताना दिसतात. पण पदपथावरून जाणाऱ्या पुणेरी काकूंनी मात्र त्यांना पुढे जाण्यासाठी रस्ताच दिला नाही. पदपथ पूर्ण संपेपर्यंत त्या हळूहळू आपल्या वेगाने चालत राहिल्या आणि तोपर्यंत सर्व दुचाकीचालक पदपथावर अडकून राहिले. जेव्हा पुल संपल्यावर पदपथावरून काकू बाजूला झाल्या तेव्हा मागून येणाऱ्या दुचाकी चालकांना पुढे जाता आले. काकूंचा हा पुणेरी अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.
येथे पाहा Video
व्हायरल व्हिडिओ शेअर इंस्टाग्रामवर abhayanjuu (अभय चौघुले) नावाच्या पेजवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,” या आहेत पुणेरी काकू, पुलाच्या पदपथावरून जाणाऱ्या सर्व दुचाकीस्वारांना धडा शिकवला” व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, ” काकूंनी तिथेच थांबायला पाहिजे होते किंवा पाय दुखत आहेत म्हणून बसून राहायला पाहिजे होते.”
दुसऱ्याने लिहिले की, “तो पदपथ पादचाऱ्यांसाठी आहे, दुचाकीचालकांसाठी नाही”
तिसऱ्याने लिहिले की, ” बरोबर आहे काकुंचे… जर दुचाकीस्वार पादचारी मार्ग वापरत असतील तर लोकांनी कुठून चालायचे ??”
हेही वाचा – महेश बाबू अन् श्रीलीलाला ‘या तरुणींनी दिली टक्कर! साडी नेसून केला भन्नाट डान्स, Video होतोय तुफान Viral
चौथा म्हणाला की, वाकडपुलाच्या पुढे Avon Vista Building शेजारी हा पुल आहे. पुण्यामध्ये दुचाकीचालक कसेही दुचाकी चालवतात. काकू रॉक्स!
पाचव्याने लिहिले की, “खऱ्या पुणेरी काकू”
सहाव्याने लिहिले की, “एक नंबर! असेच केले पाहिजे नाहीतर चालायला जागाच राहणार नाही!”
तुम्हाला काय वाटते, काकूंनी जे केले ते योग्य केले का?
© IE Online Media Services (P) Ltd