ST Bus Drivers Praised By Puneri Kaka: वाईटाला वाईट बोलणं जितकं गरजेचं आहे तितकंच चांगल्याचं कौतुक करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण अशा सकारात्मक प्रोत्साहनानेच चांगल्याचा चांगुलपणा टिकून राहण्यास मदत होते, आता ही नुसती फिलॉसॉफी नसून खरोखरच हा विचार एका व्हायरल पोस्टमधून दिसून येत आहे. अलीकडे गणेशोत्सवात एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना आलेला एक अनुभव सांगत एका पुणेरी काकांनी विजयदुर्ग एसटी स्थानकातील प्रमुखांना पत्र धाडले आहे. या पत्रातील मथळा वाचून भारावून गेलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून हे पत्र पोस्ट करण्यात आले आहे. नेमकं काय म्हटलंय या पत्रात चला पाहूया…
एसटी महामंडळाच्या पोस्टनुसार शरद खाडिलकर या पुणेरी प्रवाशाने हे पत्र लिहिले आहे. १७ सप्टेंबर २०२३ ला पुणे ते तरळे असा प्रवास करताना त्यांना पुणे-विजयदुर्ग MH २० BL/३१६० या गाडीत आलेला अनुभव त्यांनी शेअर केला आहे. खाडिलकर लिहितात की, “गणपतीच्या निमित्ताने गाडीत प्रचंड गर्दी असताना, काही जण तर पुणे ते कोल्हापूर उभ्याने प्रवास करत होते. यावेळी बसवाहक, श्री. मगर व बसचालक श्री. शिरसाट यांचा व्यवहार अत्यंत चांगला होता. मी मागील १० वर्षांपासून एसटीने सर्वत्र प्रवास करत आहे. आपल्यासारख्या कर्मचाऱ्यांनी एसटीची प्रतिष्ठा वाढत आहे. गावोगावी जाऊन आपली एसटी सेवा गौरवाची आहे. आपले पुन्हा एकदा अभिनंदन!”
एसटीच्या कौतुकासाठी पुणेरी काकांचे पत्र
हे ही वाचा<< ४० किलोचं पोट, ९ बाळं, २ वर्षं.. ‘या’ महिलेच्या कहाणीने पाणावतील डोळे; नेमकं खरं घडलं काय?
दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून हे पत्र पोस्ट करताना प्रवासी देवो भवः असे लिहिण्यात आले आहे, तसेच आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे असेही कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे. तुम्हालाही एसटीने प्रवास करताना कधी असा चांगला अनुभव आला आहे का? असल्यास कमेंट करून आमच्यासह वाचकांशी सुद्धा नक्की शेअर करा.