Puneri pati on T20 World Cup 2024: पुणे तिथे काय उणे, असं म्हटलं जातं. पुणेकर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तिरकस स्वभावामुळे चारचौघांत उठून दिसतो. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत आला आहे. आता हेच पाहा ना, एका पुणेरी पाटीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र, यावेळी पुणेकरांनी या पाटीवर कुणाचा अपमान नाही केला. विश्वचषकाच्या ऐतिहासिक विजयानंतर सर्व स्तरांवर भारतीय संघाचं कौतुक करण्यात येत आहे. मग पुणेकर तरी मागे कसे राहतील? पुण्यातल्या एका तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो एक पाटी घेऊन उभा आहे. या पुणेरी पाटीवर असं काही लिहिलं आहे की, ते पाहून तुम्हीही म्हणाल एकदम बरोबर… तर असं काय लिहिलंय या पाटीवर चला पाहू…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकरा वर्षांचा वनवास…

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी काल रविवारी (३० जून) पुण्यात दाखल झाल्यानंतर तरुणानं ही पुणेरी पाटी चौकात झळकवल्याचं पाहायला मिळालं. पंढरीची वारी आणि विश्वचषकातील ऐतिहासिक विजय या पार्श्वभूमीवर या तरुणानं ही पाटी लिहिली आहे. खरं तर या तरुणानं विठ्ठलाचे आभारच मानले आहेत, ते कसे ? पाहूयात. या तरुणानं पाटीवर ‘अकरा वर्षांचा वनवास संपवलास की रे विठ्ठला…’ असा मजकूर लिहिला आहे. यावेळी या पाटीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ही पाटी वाचून हास्य उमटत होतं. रत्नदीप शिंदे नावाच्या या तरुणानं ही पाटी पुण्यात झळकवली आहे.

पुणेरी पाटीनं वारकऱ्यांचं लक्ष वेधलं

क्रिकेट हा भारतासह जगभरातील लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. भारतात धर्मवेड्यांप्रमाणेच क्रिकेटवेड्या लोकांचा एक वेगळा गट आहे. अनेक तरुणांचं क्रिकेट हे पहिलं प्रेम असतं. अशाच क्रिकेटप्रेमींच स्वप्न अखेर पूर्ण झालं आणि याच पार्श्वभूमीवर ही पुणेरी पाटीही व्हायरल होतेय. संत तुकारामांची पालखी २८ जून रोजी देहूहून पंढरपुराकडे मार्गस्थ झाली आहे. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पायी पालखीही पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. माऊलींच्या आजोळघरातून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी रविवारी ५ वाजून ४५ मिनिटांनी पुण्याकडे मार्गस्थ झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा रविवारी पहिला मुक्काम पुण्यात होता. यावेळी पुण्यामध्ये रविवारी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही सोहळ्यातील वारकरी एकत्र आले. यावेळी चौकात झळकणाऱ्या या पाटीनं वारकऱ्यांचंही लक्ष वेधून घेतलं.

पाहा पुणेरी पाटी

हेही वाचा >> “क्रिकेट असो वा आयुष्य…” भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर आनंद महिंद्रा म्हणाले ‘या’ व्यक्तीच्या आशिर्वादामुळेच जिंकलो

आतापर्यंतची सगळ्यात भारी पुणेरी पाटी

हा व्हिडीओ a_poetic_storyteller नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला “माऊली-माऊली काय सांगू तुम्ही पंढरीला विठ्ठलाकडे निघालात आणि भारताच्या पठ्ठ्यांनी विठुरायाच्या चरणी ठेवायला टी-२० वर्ल्ड कप जिंकला आणि ११ वर्षांचा वनवास संपवला बघा!” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तर नेटकरीही यावर प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरनं म्हटलंय, “आतापर्यंतची सगळ्यात भारी पुणेरी पाटी”; तर आणखी एकानं “विठ्ठलाचीच कृपा”, अशी प्रतिक्रिया लिहिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Puneri pati on t20 world cup 2024 and ashadhi vari sant dnyaneshwar maharaj and sant tukaram maharaj palkhi video goes viral srk