Puneri poster viral: अगोदर शिक्षण घ्या, पोटाचा प्रश्न सोडवा आणि मग कार्यकर्ता बना कारण उपाशी पोटी तयार झालेला कार्यकर्ता कालांतराने लाचार बनतो..डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं हे वाक्य तुम्ही ऐकलंच असेल. देशभरात लोकसभेच्या निवडणुका सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर नेत्यांच्या प्रचार सभा, रॅली सुरु आहेत. या प्रचारामध्ये तरुण वर्ग मोठ्या संख्येने पाहायला मिळतो. पूर्वी राजकारणात वयस्कर लोकांचं प्रमाण जास्त असायचं. मात्र आता परिस्थिती अगदी उलट आहे. हल्ली राजकारणात तरुण पिढीचा सहभाग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. यातले बहुतेक तरुण हे शिक्षण घेणारे महाविद्यालयीन विद्यार्थी असतात. तर काही नुकतेच शिक्षण पूर्ण झालेले असतात. या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या एका तरुणानं पाटीवर एक वाक्य लिहत आजच्या तरुण पिढीला टोला लगावला आहे. तरुणाच्या हातातल्या या पोस्टरचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
नोकरी किंवा व्यवसाय नसलेल्या तरुणांचा भविष्यकाळ अत्यंत बिकट असणार आहे. हल्लीची तरुण पिढी काम धंदा, शिक्षणाकडे लक्ष न देता या नेत्यांच्या पुढे-मागे करण्यात आपला अमूल्य वेळ घालवताना दिसते. अशाच मुलांना या तरुणां चांगलाच टोला लगावला आहे. आता तुम्ही म्हणाल या व्हायरल पोस्टरवर असं काय लिहलं आहे? या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण पुण्याच्या रस्त्यावर हातात एक पोस्टर धरुन उभा आहे. या तरुणाकडे येणारे जाणारे सगळे बघत आहे. कुणी थांबून पोस्टरवर काय लिहलं आहे हे सुद्धा वाचत आहे तर काहीजण या तरुणासोबत फोटो काढत आहेत.
या पोस्टरवर “आईबापाला घोटभर पाणी न देणारं पोरगं, नेत्याच्या वाढदिवसाला बाटलीभर रक्त देवून येतं.” असं लिहलं आहे. या वाक्यातून तरुणानं वास्तव सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या तरुणाचं सगळे कौतुक करत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> जपानमध्ये मेट्रो चालवण्यापूर्वी केले जाते ‘हे’ काम; VIDEO पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल “हे भारतातही हवे”
हा व्हिडीओ comedy_wala_basu या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखोंमध्ये व्ह्यूज गेले आहेत. तसेच नेटकरी यावर भरभरून प्रतिक्रियाही देत आहेत. एका युजरने म्हंटलं की, “जेवढा वेळ आपण नेत्यांच्या मागे धावण्यात वाया घालवितो, तेवढ्या वेळात एखाद्या कपड्याच्या दुकानात काम करून महिन्याकाठी ५ ते १० हजार रुपये कमवून आपण आपल्या आई वडिलांच्या हाती देऊ शकत असू, तर या जगात आपल्यापेक्षा मोठा विकासपुरुष अन्य कुणीही असू शकत नाही…”
तर दुसऱ्या एका यजरने कमेंट केलीय की, “तुमचं तारुण्य निघून गेल्यावर कुणीही तुम्हाला दारू पाजणार नाही किंवा मटन खाऊ घालणार नाही, कारण तुमचा उपयोग संपल्यावर अन्य कुणी तरी दुसरा मूर्ख तरुण रिक्रुटमेंटसाठी कायम नेत्यांपुढे तयार असेलच . मग चोरी, गुन्हेगारी किंवा आत्महत्या या तीन पर्यायांखेरीज अन्य कुठचाही पर्याय तुमच्याजवळ शिल्लक नसेल…हे वय नेत्यांच्या मागे धावण्यात वाया घालवू नका…”