महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई-पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने धुमाकुळ घातला आहे. रस्ते जलमय झाले आहे, रेल्वे आणि रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पुणे, मुंबईतील काही ठिकाणी शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे रेड अर्लट जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान पुण्यातील ऐतिहासिक पेशवे कालीन कात्रजचा तलाव देखील ओव्हरफ्लो झाला आहे.
पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढले आहे. धरण परिसरात १०० मिलिमीटर आणि घाटमाथ्यावर २०० मिलिमीटरपेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात सकाळी सहा वाजल्यापासून ३५५७४ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान कात्रजचा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. पाटबंधारेविभागामार्फत यथील बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्याच आले आहे आणि पाणी राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात सोडले जात आहे. कात्रज नवीन वसाहत येथील नाल्यातून आंबील ओढ्यामध्ये पाणी पुढे जात आहे.
हेही वाचा – पुण्यात पावसाचा कहर! प्रसिद्ध भिडे पूल गेला पाण्याखाली, पाहा Video Viral
२०१९ मध्ये आंबील ओढ्याला आला होता पूर
२०१९ मध्ये झालेल्या ढगफुटीसदृश पावसावेळी कात्रज तलाव पूर्ण भरून वाहिल्याने पाणी आंबील ओढ्यात येऊन पर्वती, सहकारनगरमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी त्यामुळे महापालिकेच्या सांडपाणी आणि मलनिस्सारण विभागाने जुलै २०२३ मध्ये कात्रज तलावातील गाळ आणि जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले होते. त्या अंतर्गत दहा हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. तलावातील गाळ काढल्याने तलावाची साठवणूक क्षमता एक कोटी लीटरने वाढल्याचे महापालिकेचे म्हणणे होते.
हेही वाचा – पुण्यातील खडकवासला धरणाचे दरवाजे उघडल्यानंतरचे दृश्य! व्हिडीओ होतोय व्हायरल
कात्रज तलावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी
सुमारे ४२ एकरात असलेल्या कात्रज तलावाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबाबत इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी माहिती दिली. नानासाहेब पेशवे यांनी १७४५ ते १७५५ या काळात कात्रजचा तलाव बांधला. या तलावातील पाण्याचा पुरवठा शनिवारवाडा आणि जुन्या पुण्यातील काही भागात भुयारी मार्गाने केला जायचा. या भुयारी मार्गादरम्यान काळा हौद, बाहुलीचा हौद, बदामी हौद, सदाशिव पेठ हौद येथे पाणी काढले जायचे. १९९० पर्यंत तलावातील पाण्याचा पुरवठा शहराला केला जायचा, असे त्यांनी सांगितले.