Python Viral Video : साप, अजगर नाव ऐकताच भीतीने अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. कारण हे प्राणी एका क्षणात माणसाला मरणयातना देऊ शकतात. यामुळे भले भले या सरपटणाऱ्या प्राण्यांपासून दूरच राहणे पसंत करतात. पण विचार करा, एक भलामोठा अजगर वेटोळे घालून जर तुमच्यासमोर बसला असेल तर तुम्ही काय कराल? विचार करूनच भीती वाटली ना. पण असे काही अवलिये आहेत जे कसलीही भीती न बाळगता साप, अजगर समोर आला तरी त्यांच्यासोबत अगदी मित्र असल्याप्रमाणे वागतात. अनेकदा काही जण या प्राण्यांसोबत एवढे फ्रेंडली होतात की त्यांना मिठ्या वैगरे मारू लागतात. सध्या सोशल मीडियावर अजगर आणि चिमुकल्याचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हालाही घाम फुटल्याशिवाय राहणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजगराचा धडकी भरवणारा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक छोटा मुलगा महाकाय अजगराच्या अगदी जवळ जातो आणि काही वेळ त्याच्या तोंडाला पकडून त्याला उचलण्याचा प्रयत्न करतो. यानंतर तो त्याला थोडे पुढे ओढत नेतो, हे पाहून आपल्याला धडकीच भरते. पण चिमुकला इथेच थांबत नाही, नंतर तो काही सेकंदांनी अजगराने शरीराच्या केलेल्या वेटोळ्यात जाऊन आरामात बसतो. अजगरासोबत मस्ती करताना चिमुकल्याच्या चेहऱ्यावर भीती नाही तर एकप्रकारचा आनंद दिसत होता. या व्हिडीओवरून असा अंदाज केला जात आहे की, हा पाळलेला महाकाय अजगर आहे. त्यामुळे चिमुकला त्याच्याशी एवढी मस्ती करूनही तो अजिबात त्याच्यावर हल्ला करत नाही. चिमुकला त्यांच्या तोंडाला धरून अगदी अलगद उचलून खाली ठेवतो, त्याच्या पाठीवर जाऊन बसतो तरी अजगर काही हालचाल करत नाही.

हेही वाचा : पाइपमध्ये लपून बसला होता भलामोठा किंग कोब्रा, मोबाइलची बॅटरी दाखवताच…; पाहा थरारक Video

चिमुकल्याने पकडले अजगराचे तोंड

ट्विटवर @figen नावाच्या अकाउंटवरून हा खतरनाक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून अनेक यूजर्स शेअर करत आहेत. केवळ ३० सेकंदांच्या या व्हिडीओला आत्तापर्यंत ८९.५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, निष्काळजी आई-वडील… या व्हिडीओवर अनेक यूजर्स संताप व्यक्त करत आहेत, कमेंट्सच्या माध्यमातूनही अनेकांनी चिमुकल्याच्या आई-वडिलांच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले आहे. एखादा महाकाय अजगर कोणालाही जिवंत गिळू शकतो. पण तरीही अनेक जण अशा प्रकारे अजगरासोबत मस्ती करण्याचे धाडस करतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Python attack video huge burmese python attack toddler python scary trending video viral on social media sjr
Show comments