आज देशभरात शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने आज अनेकांकडून आपापल्या शिक्षकांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. मात्र, त्याचवेळी सोशल मिडीयावर एक वेगळाच ट्रेंड पाहायला मिळत आहे. शालेय जीवनापासून आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी गुरूंकडे धाव घेणाऱ्यांनी सध्या इंटरनेटरूपी गुरूकडे मदतीचे याचना केल्याचे चित्र दिसत आहे. सध्या इंटरनेटवर अनेक ठिकाणी शिक्षक दिनाविषयीच्या विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. शिक्षकदिन म्हणजे नक्की काय?, शिक्षकदिन का साजरा केला जातो?, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन कोण होते, अशा एक ना अनेक प्रातिनिधिक शंका नेटिझन्सच्या मनात आहेत. त्यामुळेच अनेक सर्च इंजिन्सवरील टॉप सर्च ट्रेंडमध्ये शिक्षकदिनाबद्दलचेच प्रश्न दिसून येत आहेत.
शिक्षकदिन म्हणजे काय?
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस देशभरात शिक्षक दिन (५ सप्टेंबर) म्हणून साजरा केला जातो. त्यांनी भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषविली. देशात आणि परदेशात त्यांनी अनेक सन्मान मिळविले. पण ते शेवटपर्यंत आदर्श शिक्षक म्हणून सर्वांना परिचित होते, त्यामुळे त्यांचा जन्म दिवस ‘शिक्षकदिन ‘म्हणून पाळला जातो.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन कोण होते?
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी आंध्र प्रदेशातील तीरुत्तानी या गावी झाला. त्यांनी आपल्या कर्तृत्त्वाच्या बळावर भारताचे राष्ट्रपतीपद भुषविले. मात्र, शिक्षणक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. डॉ.राधाकृष्णन यांनी आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ यांचे कुलगुरू पद भूषविले. नंतर १९३१ ते १९३९ हि वर्षे त्यांनी राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधित्व केले. १९४९ ते १९५२ मध्ये रशियातील राजदूत म्हणून त्यांची भारत सरकारने नियुक्ती केली होती. त्या देशातही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविला. ते १९५२ मध्ये भारतात परतताच त्यांना प्रथम उपराष्ट्रपती पदावर १९५२ ते १९६२ पर्यंत कार्यरत होते. भारताचे दुसरे राष्ट्रपती होण्याचा मान त्यांना मिळाला. १९५४ साली भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब बहाल केला.
आपण शिक्षक दिन का साजरा करतो?
आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या आणि आपली जडणघडण करणाऱ्या आदर्श गुरूचा सन्मान करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो. गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी हा दिवस योजलेला आहे.