भारतीय जनता पार्टीचे आमदार मिहिर कोटेचा यांनी मराठी गायक राहुल देशपांडे यांचा अपमान केल्याच्या प्रकरणावर राहुल देशपांडेंनीच प्रतिक्रिया देत पडदा टाकला असला तरी या प्रकरणाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. कोटेचा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई भाजपानेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा सत्कार करण्यासाठी राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. याच वादावरुन आता भाजपाच्या एका नेत्याने राहुल देशपांडेंनेच टायगर श्रॉफचा अपमान केल्याचा दावा केला आहे. या ट्वीटला संगीतकार कौशल इनामदार यांनी रिप्लाय दिला आहे.
नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंसंदर्भातील ‘ती’ एक चूक शिवसेनेला महागात पडली; आदित्य ठाकरेंचं रोखठोक मत
नेमकं घडलं काय?
वरळीमधील जांबोरी मैदानात दिवाळीनिमित्त भाजपाकडून ‘मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गायक राहुल देशपांडे आपलं गाणं सादर करत होते. याचवेळी टायगर श्रॉफ कार्यक्रमस्थळी पोहोचला. यामुळे त्याचा सत्कार करण्यासाठी राहुल देशपांडे यांना काही वेळासाठी गाणं थांबवण्यास सांगण्यात आलं. मात्र राहुल देशपांडेंनी मी उठू का असं विचारत याला आक्षेप घेतला. मला २० मिनिटं गाऊ द्या त्यानंतर तुम्हाला हवं ते कसा असं राहुल यांनी सांगितल्यानंतर स्टेजच्या कोपऱ्यातच टायगर श्रॉफला फ्रेम देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. यासंदर्भातील व्हिडीओ ठाकरे गटातील आमदार सचिन अहिर यांनी ट्वीट केला.
नक्की वाचा >> ‘मी, फडणवीस, पवार एकत्र असल्यानं काही जणांची…”; पवार अन् फडणवीसांच्या मध्ये उभं राहून भाषण देताना CM शिंदेंचा ठाकरेंना टोला
भाजपाचे ट्वीट
अहिर यांच्या ट्वीटवर मुंबई भाजपाने रिप्लाय करताना, “एक कलाकार दुसऱ्या कलाकाराचा सन्मान करत थांबतोय, तरीही घटनेचा विपर्यास करण्याचा करंटेपणा केला जात आहे. हे सत्ता गेल्याचं दुःख आहे, की पहिल्यांदा मु्ंबईत मराठीसण जोशात साजरे केले जाण्याची पोटदुखी?” असा टोला लगावला.
कौशल इनामदारचा भाजपाला रिप्लाय
संगीतकार कौशल इनामदार यांनी भाजपाच्या या ट्वीटला रिप्लाय करताना, “ही सारवासारव आहे. जे झालं ते चुकीचं झालंय. कुणासाठीही कार्यक्रम असा मध्ये थांबवणं हा फक्त कलाकाराचाच नव्हे तर कलेचाही अपमान आहे,” असं म्हणत नाराजी व्यक्त केली.
नक्की वाचा >> “शरद पवार २०२४ च्या निवडणुकीमध्ये मोदींना साथ देतील असा विश्वास वाटतो”; मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याचं विधान
अवधूत वाघ म्हणतात, “राहुल देशपांडेंनीच टायगर श्रॉफचा अपमान केला”
कौशल यांच्या ट्वीटला भाजपाचे नेते अवधूत वाघ यांनी रिप्लाय दिला. वाघ यांनी आपल्याला कौशल यांची टीका योग्य वाटली नाही असं म्हटलं. “मला नाही वाटत राहुल यांचा अपमान झाला. आयोजकांनी टायगरचा मध्येच सत्कार घेण्याची विनंती केली. राहुल यांनी ती नाकारली. आयोजकांनी टायगरला मुंबादेवीची प्रतिमा देवून पाठवणी केली. यावेळी राहुल गाणे गात नव्हते. मग गाणे थांबवले, अपमान झाला हे कसे? खरा अपमान राहुलने टायगरचा केला,” असा युक्तीवाद वाघ यांनी केला.
कौशल इनामदार म्हणतात, “हे अत्यंत विनोदी”
कौशल इनामदार यांनी अवधूत वाघ यांना रिप्लाय देताना, “विनंती असती तर राहुलचं म्हणणं ऐकलं असतं. हे शिष्टाचाराला अजिबात धरून नाही. हेच राजकारणी स्वत:च्या प्रोटोकॉलबद्दल नको तितके सजग असतात. राहुलने टायगरचा अपमान केला हे म्हणणं तर अत्यंत विनोदी आहे,” असा टोला लगावला.
अवधूत वाघ म्हणतात, “मान-अपमानाच्या पुढे कधी जाणार?”
“हे सारे होत असताना मुंबईमध्ये सर्वप्रथम असा मोठा मराठी दिवाळी महोत्सव तोही मराठी विभागात, याबद्दल कधी विरोधकांनी आयोजकांचे अभिनंदन केले आहे का? फक्त दोष पहायचे?” असा प्रश्न पुढच्या ट्वीटमध्ये वाघ यांनी विचारला. “मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करणे किती कठीण असते हे सगळे जाणतात. मान अपमान याच्यापुढे आपण कधी जाणार? टायगर कलाकार नाही का?” असा सवालही वाघ यांनी ट्वीटमधून विचारला.
या सर्व प्रकरणावर राहुल देशपांडे काय म्हणाले?
राहुल देशपांडे यांनी अपमान झाल्याचा दावा फेटाळला आहे. “इतकी काही मोठी गोष्ट घडलेली नाही. मला काही अपमान वैगेरे वाटलेला नाही. मला हा विषय इतकं बोलण्यासारखा वाटत नाही,” असं सांगत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे.