dk shivakumar meets chandrababu naidu after 2024 lok sabha elections result : लोकसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता नवे सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यंदाच्या निकालात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही; मात्र भाजपा मित्रपक्षांच्या सहकार्याने सरकार स्थापण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यात आता एनडीए आघाडीमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. बुधवारी (५ जून) माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा खासदार यांची संयुक्त जनता दल पक्षाचे प्रमुख व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांच्याबरोबर बैठक पार पडली.

पण सत्तास्थापनेच्या या बैठकांच्या सत्रात आता काँग्रेस नेते व कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्या व्हिडीओद्वारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान होण्यासाठी चंद्राबाबू नायडू यांनी मदत करावी याकरिता डी. के. शिवकुमार यांनी त्यांची भेट घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावरून आता चंद्राबाबू नायडू अन् डी. के. शिवकुमार यांच्या मदतीने राहुल गांधी पंतप्रधान होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण, खरंच डी. के. शिवकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची भेट झाली का? आणि त्यांच्या भेटीदरम्यान राहुल गांधी हे पंतप्रधान होण्याच्या दृष्टीने कसलीही चर्चा झाली होती का? नेमके या व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे याबाबत जाणून घ्या.

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर Radha Avinash ने हा व्हिडीओ आपल्या अकाउंटवरून शेअर केला.

इतर युजर्सदेखील हाच व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास :

आम्ही व्हिडीओवरून मिळविलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च चालवून तपास सुरू केला.

एका कीफ्रेमद्वारे आम्हाला ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’वर ‘नायडू-डीकेएस मीट स्पार्क्स स्पेक्युलेशन’ या शीर्षकाची बातमी सापडली.

२९ डिसेंबर २०२३ रोजी प्रकाशित झालेल्या या वृत्तात व्हिडीओचा स्क्रीनशॉटदेखील होता. बातमीत नमूद करण्यात आले होते, ‘गुरुवारी TDP सुप्रीमो एन. चंद्राबाबू नायडू आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यात बंगळुरू विमानतळावर झालेल्या भेटीमुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आंध्र प्रदेशमधील राजकीय समीकरणांमध्ये संभाव्य बदलाबाबत नव्या अटकळींना सुरुवात झाली.’

हेही वाचा – राहुल गांधींकडून ५० वर्षांसाठी पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा? विरोधकांकडून टीका; जाणून घ्या काय आहे सत्य

आम्हाला एनडीटीव्हीच्या वेबसाइटवरही ही बातमी सापडली.

https://www.ndtv.com/india-news/tdps-nara-lokesh-coincidental-son-on-chandrababu-naidus-meet-with-dk-shivakumar-4764794

आम्हाला या भेटीचा एक व्हिडीओदेखील सापडला.

तसेच Bharathi TV Daily च्या यूट्यूब चॅनेलवरून हा व्हायरल व्हिडीओ घेतला गेल्याचे समजले.

पाच महिन्यांपूर्वी अपलोड केल्या गेलेल्या व्हिडीओचे शीर्षक होते (भाषांतर) : चंद्राबाबू नायडू यांची बेंगळुरू विमानतळावर डी. के. शिवकुमार यांच्याबरोबर भेट झाली.

निष्कर्ष : काँग्रेसचे डी. के. शिवकुमार आणि टीडीपीचे एन. चंद्राबाबू नायडू यांच्यातील अचानक झालेल्या भेटीचा जुना व्हिडीओ अलीकडेच झालेली घटना, असे दर्शवून तो व्हायरल करण्यात आला आहे. पण, व्हायरल केले गेलेले दावे दिशाभूल करणारे आहेत.