Rahul Gandhi Comments On Udaipur Tailor Killing Incident: लाइटहाऊस जर्नालिझमला राहुल गांधी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या बाईटचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. २०२२ मध्ये उदयपूरमध्ये राजस्थानमधील उदयपूर येथे एक शिवणकाम व्यावसायिक कन्हैया लालची हत्या झाली होती. या हत्येतील आरोपींच्या समर्थनार्थ राहुल गांधी बोलत असल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. गौस मोहम्मद आणि रियास अटारी या दोघांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड रेकॉर्ड करून कन्हैया यांना मारल्याची कबुली दिली होती. त्यांनी कन्हैयाची हत्या केल्याचे मान्य केले. त्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली. राहुल गांधी खरोखरच अशा आरोपींची बाजू घेत होते का, याविषयी आम्ही तपास केला असता आम्हाला त्यातील तथ्य लक्षात आले.
काय होत आहे व्हायरल?
X युजर Manoj Srivastava ने दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल व्हिडीओ शेअर केला.
इतर वापरकर्ते देखील हाच दावा शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही गुगल रिव्हर्स इमेज सर्च आणि कीवर्ड सर्च करून आमचा तपास सुरू केला. एका कीवर्डमुळे आम्हाला न्यूज नाइनच्या वेबसाइटवरील बातमीचा अहवाल मिळाला. १ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तात, काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी कलपेट्टा येथील कार्यालयाच्या भेटीदरम्यान SFI सदस्यांनी केलेल्या हल्ल्याविषयी केलेल्या विधानाचा उल्लेख केला आहे.
अहवालात असे नमूद केले आहे की: काँग्रेस नेते व वायनाड लोकसभा मतदारसंघातील खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी त्यांच्या मतदारसंघातील कलपेट्टा येथील कार्यालयास भेट दिली. याठिकाणी गेल्या आठवड्यात SFI कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. शुक्रवारपासून गांधी त्यांच्या मतदारसंघात तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, “हे वायनाडच्या लोकांचे कार्यालय आहे. जे झालं ते दुर्दैवी आहे. पण हल्लेखोर ही लहान मुले आहेत, त्यांनी मूर्खपणा केला आहे, मला त्यांच्याबद्दल राग नाही किंवा त्यांच्याशी शत्रुत्व नाही.” या भेटीदरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमन चंडी, के सुधाकरन, केसी वेणुगोपाल आणि व्हीडी सतीशन हे सुद्धा गांधींसह होते. या नेत्यांनी कार्यालयातील खराब झालेल्या फर्निचरची पाहणी केली.
आम्हाला त्याच बद्दल इतर अनेक बातम्या सापडल्या.
एका बातमीत गांधींच्या भेटीचे अनेक तपशील होते.
तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी शुक्रवारी वायनाड येथे पोहोचलेल्या राहुल यांनी वायनाड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या कलपेट्टा येथील तोडफोड झालेल्या कार्यालयाला भेट दिली. राहुल गांधी म्हणाले की, “हे माझं ऑफिस आहे. पण माझे कार्यालय होण्यापूर्वी हे वायनाडच्या लोकांचे कार्यालय आहे. कार्यालयावर हल्ला होणे अत्यंत दुर्दैवी आहे. हिंसाचाराने कधीच समस्या सुटणार नाहीत. हल्लेखोर बेजबाबदारपणे वागले हे चांगले नाही. माझ्या मनात त्यांच्याबद्दल कोणताही राग किंवा वैर नाही. ती मुले आहेत आणि त्यांना त्यांच्या कृत्याचे परिणाम समजत नाहीत.” यावेळी SFI किंवा CPI(M) या दोघांचाही उल्लेख राहुल गांधींनी केला नाही.
याच अहवालात पुढे गांधींनी भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या निलंबनाविषयी सुद्धा भाष्य केले. नुपूर शर्मा यांनी पैगंबरांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपाच्या प्रवक्त्या म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले होते या कारवाईचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, “देशातील वातावरण सत्ताधारी कारभारामुळे वाईट झाले आहे. ही टिप्पणी करणाऱ्या व्यक्तीनेच नाही, तर पंतप्रधान, गृहमंत्री, भाजपा आणि आरएसएसने देशात हे वातावरण निर्माण केले आहे. उदयपूरमध्ये झालेल्या हत्येचा उल्लेख करताना न्यायालयाने शर्मा हा देशात जे काही घडले त्याला एकटा जबाबदार आहे असे म्हटले होते.”
पुढे कीवर्ड सर्चदरम्यान, आम्हाला काही अहवाल सापडले ज्यात राहुल गांधींच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आल्याचा उल्लेख आहे.
अहवालात नमूद केले आहे: कासवान यांनी आरोप केला की “ती लहान मुले आहेत आणि या कृत्याचे परिणाम त्यांना समजत नाहीत” ही ओळ १ जुलै रोजी उदयपूर येथे शिवणकाम व्यावसायिकाच्या हत्येवर गांधींची प्रतिक्रिया म्हणून प्रसारित करण्यात आली होती. “राहुल गांधींचे विधान जनतेला भडकवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने पसरवले जात आहे. मला असे वाटते की खासदार राज्यवर्धन सिंह राठोड, मेजर सुरेंद्र पुनिया आणि कमलेश सैनी हे देखील यात आहेत कारण त्यांनीही या चुकीच्या विधानाबाबत पोस्ट केल्या होत्या.” असेही पुढे कासवान म्हणाले.
राहुल गांधींनी पत्रकारांना दिलेल्या बाइटचा मूळ व्हिडीओ आम्हाला सापडला.
तह ते काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करणाऱ्यांबद्दल बोलत असल्याचे दिसून येते. पुढे आम्ही उदयपूर हत्याकांडावर राहुल गांधींच्या टिप्पण्यांबद्दल शेअर केलेल्या झी न्यूजच्या व्हिडीओ अहवालाची तपासणी केली. आम्हाला झी न्यूजने राहुल गांधींच्या वक्तव्याचा उदयपूर हत्येशी संबंध जोडल्याबद्दल माफी मागितल्याचा उल्लेख करणारे एक वृत्त आढळले.
आम्हाला झी न्यूजचा अँकर, रोहित रंजन याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा उल्लेख असलेली एक बातमी सापडली.
हे ही वाचा << अयोध्येत ८४४ कोटी खर्च करून बांधलेल्या रस्त्यावर खड्डा? ४८ वर्षीय मारिया पडल्याने होतेय भयंकर टीका, पण ही महिला आहे तरी कोण?
निष्कर्ष: राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केलेला आहे. यानुसार त्यांनी वायनाड येथील काँग्रेस कार्यालयावर हल्ला करणाऱ्या आरोपींबाबत केलेले विधान हे उदयपूर येथील शिवणकाम करणाऱ्या व्यावसायिकाच्या हत्येशी संबंधित असल्याचे सांगून व्हायरल करण्यात आले आहे. मात्र व्हायरल दावा पूर्ण खोटा आहे.