गेल्या चार वर्षांत एसी लोकल लोकप्रिय करण्यासाठी अनेक कल्पना राबविण्यात आल्या, मात्र प्रथम वर्ग श्रेणीच्या तिकीटदरापेक्षा जास्त दर असल्याने मुंबईकरांनी एसी लोकलला नापसंती दर्शवली असल्याचे दिसते. मात्र उकाडा सुरु झाल्यापासून प्रवासी एसी लोकलचा पर्याय निवडताना दिसतात. बाहेर उकाडा त्यात लोकलच्या गर्दीतून प्रवास या सगळ्याचा विचार करुन प्रवासी दोन पैसे जास्त देत एसी लोकलचा पर्याय निवडतात. अशातच माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनीही एसी लोकलचा पर्याय निवडला खरा मात्र त्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. कारण कारण भर दुपारच्या उन्हात एसी लोकलमध्ये मात्र पाणाच्या धारा पाहायला मिळाल्या. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
एसी लोकलमध्ये पाऊस
वर्षा गायकवाड यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, त्यामध्ये एसी लोलकलबाबत प्रवाशांमध्ये नाराजी पाहायला मिळाली आहे. तसेच त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत मोठी पोस्टही लिहली आहे. यामध्ये त्यांनी एसी लोकलची परिस्थिती समोर आणली आहे.
एसी लोकलमधील एका डब्यातून गळती होत असल्याचे काही प्रवाशांच्या लक्षात आले. तेव्हा वर्षा गायकवाडही तिथे होत्या, त्यांनी त्याचे चित्रण करून ते सोशल मीडियावर टाकले. ही गळती एसीशी जोडलेल्या नलिकेतून होत होती.
वर्षा गायकवाड यांची पोस्ट
“आज संध्याकाळी ५.५० च्या चर्चगेट बोरिवली एसी लोकलने प्रवास केला. ट्रेनच्या एसीमधून यावेळी बरंच पाणी गळत होतं, जणू काही पाऊसच पडत आहे. संपूर्ण डब्यात पाणीच पाणी झाले होते. याचा सर्व प्रवाशांना त्रास होत होता, अनेकांचं सामानही भिजलं.”
“माझी सहकारी, मुंबईच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी ६ ऑक्टोबर रोजी याच ट्रेनबद्दल तक्रार केली होती. परंतु अद्याप काहीही करण्यात आलेले नाही. प्रवासावेळी एसीची अजिबात हवा लागत नव्हती. बोरीवलीत पोहचेपर्यंत आम्ही पूर्णपणे घामाघूम झालो होतो, अशा शब्दात वर्षा गायकवाड यांनी प्रवाशांना होणारा त्रास व्यक्त केला.”
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> ठाण्यात चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भयानक घटनेचा VIDEO व्हायरल
शेवटी रेल्वे प्रशासनाने मुंबईच्या सर्व एसी लोकल ट्रेनचे सर्वेक्षण करावे आणि सुविधा लवकरात लवकर दुरुस्त कराव्यात, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे.