अंधेरीमधील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातील वाद शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणत्याही गटाला वापरता येणार नाही असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निर्णयानंतर वेगवगेळ्या स्तरांमधून प्रतिक्रिया उमटत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनाही प्रसारमाध्यमांना तसेच समाजमाध्यमांवरुन टीका टीप्पणी केली आहे. मात्र हे पक्षाध्यक्ष असणाऱ्या राज ठाकरेंना फारसं रुचलेलं नाही. त्यामुळेच त्यांनी समाजमाध्यमांवरुन मनसेच्या कार्यकर्त्यांना एक आवाहन केलं आहे. मात्र याच आवाहानामुळे लोकांना मनसेबरोबरच मनसेच्या नेत्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केल्याचं या पोस्ट खालील कमेंट्समध्ये दिसून येत आहे.

नक्की वाचा >> “…तर याही बाबाला घरी जावं लागेल”; CM शिंदेंबद्दल अजित पवारांचं विधान, दसरा मेळाव्यातील भाषणावरुनही शाब्दिक फटकेबाजी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरेंनी रविवारी रात्री आठ वाजल्यानंतर समाजमाध्यमांवरुन एक पोस्ट केली. यामध्ये राज यांनी, “सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये,” असं म्हटलं आहे. तसेच, “मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन,” असंही राज यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> BKC मैदानातील दसरा मेळाव्यात लोक भाषणादरम्यान उठून निघून गेल्याच्या Viral व्हिडीओंवर CM शिंदे म्हणतात, “कोणी ते व्हिडीओ…”

मात्र राज यांच्या पोस्टवर अनेक मजेदार प्रतिक्रिया वाचकांनी नोंदवल्या असून सध्या या प्रतिक्रियांचीच सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. काहींनी गुड मॉर्निंग अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. राज यांना उशीरा जाग आली आहे असा अर्थ या प्रतिक्रियेमागे दडला आहे. जीएम साहेब या अर्थाच्या प्रतिक्रियांना सर्वाधिक लाइक्स असल्याचं राज यांच्या पोस्टखाली दिसत आहे. तर मी योग्य वेळेस पक्षाची या सगळ्यावर भूमिका मांडेन या वाक्यावरुन ओंमकार शिराळकरने, “राजसाहेब दर सहा-आठ महिन्यांनी भूमिका बदलतात, ते पाहता उद्या मूड झालाच तर कदाचित उद्धव यांना पाठिंबा पण देऊन टाकतील. तीच एक भूमिका घेणे आता बाकी राहिले आहे,” अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

नक्की वाचा >> “उद्या तो नगरसेवक झाला तर त्याच्या…”; शिंदेंच्या दीड वर्षाच्या नातवावरुन टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना नारायण राणेंचा टोला

तर काहींनी राज ठाकरेंकडे आज शिवसेनेचं नेतृत्व हवं होतं असं म्हटलं आहे. विशाल उगाळे यांनी, “मनापासून वाटत आहे राजसाहेब शिवसेनाचे कार्याध्यक्ष झाले असते आज मुख्यमंत्री स्वबळावर शिवसेनाचा असता आणि रिमोट कंट्रोल राजसाहेबांकडे असते,” अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. तर पंकज सुर्वे यांनी, “साहेब दुःख शिवसेना संपल्याच आहेच पण ठाकरे फॅमिलीला आणि मोठ्या साहेबचा अस्तित्वाला हात घातला आहे. या झालेल्या प्रकरणावर तुम्ही व्यक्त होणं फार गरजेचे आहे,” अशी भावनिक प्रतिक्रिया राज यांच्या पोस्टवर नोंदवली आहे. तर सचिन गमे नावाच्या व्यक्तीने राज यांना तुम्ही स्वत: मराठीत नाव का नाही ठेवलं समाजमाध्यमांवर असा प्रश्न विचारला आहे. “साहेब नाव मराठीत का नाही केले? लोक आम्हाला प्रश्न विचारतात फारच वाईट वाटते,” असं या राज समर्थकाने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी, शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही”; जाहीर भाषणात चंद्रकांत पाटलांचं विधान

अनेकांनी राज यांच्या या भूमिकेचं समर्थनही केलं आहे. सिद्धेश रडजी यांनी, “एकदम योग्य भूमिका आहे,” असं म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी, “(संदीप) देशपांडे, (गजानन) काळे आणि शालिनीताई (ठाकरे) यांना आवरा,” असा सल्ला राज यांना दिला आहे. तर सिमा मनोहर यांनी राज यांच्या योग्य वेळी भूमिका मांडेनवरुन, “हवा कुठच्या दिशेने वाहणार याची वाट पाहताय का?” असा प्रश्न विचारला आहे. त्याचप्रमाणे सचिन अनविलकर यांनी, “मी तुमचा मोठा चाहता आहे पण एकदा घेतलेली भूमिका बदलू नका म्हणजे झालं,” असं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. तर सुजित चव्हाण यांनी, “लवकरच पलटी मारणार म्हणजे,” अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

नक्की वाचा >> Dasara Melava: “…तेव्हा राज ठाकरेंना शिव्या घालण्याचे आदेश ‘मातोश्री’वरुन आले”; शिंदे गटातील खासदाराचा खळबळजनक आरोप

आलाप नायगावकर यांनी महाराष्ट्र चित्रपट सेनेच्या अध्यक्षांना आवरावं असा सल्ला दिला आहे. “आदिपुरुष चित्रपटाचा त्यांना जाम पुळका आला आहे. बाकी जनतमच्या विरोधात बोललेत,” असं नायगावकर म्हणाले आहेत. तर बाहर कान्हीरे यांनी, “पक्षाच्या सर्व प्रवक्ता नेत्यांची प्रतिक्रिया देऊन झाल्यावर हा आदेश द्यायचा काय फायदा?” असा प्रश्न विचारला आहे.

राज्यातील सत्तासंघर्ष सुरु झाल्यापासून राज यांनी अगदी मोजक्या प्रसंगी आपली भूमिका थेट मांडली आहे. इतर वेळी पक्षाचे प्रवक्तेच प्रसारमाध्यमांसमोर भूमिका मांडताना दिसतात. त्यामध्येही प्रामुख्याने संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आणि गजानन काळे यांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray got trolled on social media as he asks supporters not to speak on current maharashtra politics on backdrop of shinde vs thackeray fight for shivsena scsg