सोशल मीडियावर सध्या राज ठाकरेंचा फोटो असणारं एक पोस्टर व्हायरल होत असून यावरुन मनसेची खिल्ली उडवली जात आहे. जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या या पोस्टरवर कुसुमाग्रज यांच्या नावाचा उल्लेख असला तरी फोटो मात्र पु ल देशपांडे यांचा लावण्यात आला आहे. हे पोस्टर चार वर्षांपुर्वीचं असून यानिमित्ताने पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेवर टीका होत आहे.
सोशल मीडियावर अनेकदा काही पोस्ट न तपसताच फॉरवर्ड केल्या जातात. हा त्यातलाच एक प्रकार आहे. कारण राज ठाकरे यांनी स्वत: या पोस्टवर चार वर्षांपुर्वीच खुलासा केला होता.
राज ठाकरे यांनी त्यावेळी खुलासा करताना माहिती दिली होती की, चौकशी केल्यानंतर हे पोस्टर मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेलंच नसल्याचं कळलं. दुसरंच कोणीतरी हा खोडसाळपणा केला आहे. हा प्रकार म्हणजे स्वत: काही करायचं नाही आणि दुसरं कोणीतरी करतंय तर ते बघवत नाही असा झाला.
कुसुमाग्रज कोण आणि पु ल देशपांडे कोण हे निदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना सागंण्याची गरज नाही. कारण महाराष्ट्र प्रेम हे फक्त राजकारणासाठी वापरायचं असं महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत नाही असंही राज ठाकरे यांनी आपल्या खुलाशात सांगितलं होतं.