मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा अमृता फडणवीस यांना राज ठाकरेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी राज ठाकरे म्हणजे ‘एन्टरटेनमेंट… एन्टरटेनमेंट… एन्टरटेनमेंट…’ असल्याचे उत्तर दिले. याच टीकेवरुन आता मनसे समर्थकांनी अमृता फडणवीस यांना ‘मा.मु.ची (माननीय मुख्यमंत्री) मामी करमणुकीची नाही कमी’ असं म्हणत त्यांचा बोटीवर सेल्फी क्लिक करण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
अमृता फडणवीस यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रॅपीड फायर प्रश्नांमध्ये राज यांच्याबद्दल बोलायला सांगितले त्यावेळीस त्यांनी ‘एन्टरटेनमेंट… एन्टरटेनमेंट… एन्टरटेनमेंट…’ असे उत्तर दिले. यावरुन आता मनसेच्या समर्थकांनी अमृता यांनी अरबी समुद्रामधील क्रूझच्या कोपऱ्यावर बसून काढलेल्या सेल्फीचा व्हिडिओ पोस्ट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस म्हणजे एन्टरटेनमेंट… एन्टरटेनमेंट… एन्टरटेनमेंट…’ अशी कॅप्शन देऊन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये #मामूची_मामी_करमनूकीची_नाही_कमी हा हॅशटॅग राज यांच्या समर्थकांनी वापरला आहे.
मागील वर्षी २० ऑक्टोबर रोजी मुंबई गोवा क्रुझ पर्यटन सेवा सुरु करण्यात आली. अमृता फडणवीस यांनी मुंबई-गोवा क्रुझवर अगदी टोकावर जाऊन सेल्फी घेतला होता. यावरुन नंतर बराच वादही झाला होता. याच सेल्फी घेण्याचा व्हिडिओ मनसेच्या समर्थकांनी पोस्ट केला आहे.
अमृता यांनी केलेल्या टीकेवरुन मनसेने अथवा राज ठाकरे यांनी अद्याप कोणताही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र राज ठाकरे यांच्या समर्थकांनी अमृता यांच्या या टीकेवरुन त्यांच्यावर निशाणा साधल्याचे अनेक व्हिडिओ आणि पोस्टमधून पहायला मिळत आहे.