मृत व्यक्ती गेली म्हणून शोक करत असलेल्या एका कुटुंबात अचानक आनंदाचा क्षण आला आहे. त्याचे कारणही तसेच आहे, ९५ वर्षाच्या एका आजोबांना मृत घोषित केल्यानंतर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. पण यादरम्यान ते अचानकपणे उठून बसले. या अनोख्या गोष्टीमुळे राजस्थानमधील जयपूर येथील गुर्जर कुटुंबीयांच्या आनंदाला पारावर राहीला नाही. बुद्धराम गुर्जर यांना अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे त्यांचे कुटुंबिय अतिशय दु:खात होते. त्यांनी आपल्या दूरच्या नातेवाईकांना बोलवून घेतले आणि अंत्ययात्रेची तयारीही केली.

त्यांचे काही विधी उरकून बुद्धराम यांना स्नानासाठी नेण्यात आलं. तेव्हा काही मिनिटांतच त्यांचा श्वासोच्छवास सुरू झाला आणि ते अचानक जागे झाले. घरातील पुरुषांनी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे निधन झाल्याने मुंडणही केले. ते अचानक उठून बसल्याने नातेवाइकांनी त्यांची चौकशी केली. तेव्हा त्यांनी छातीत दुखत असल्याने आपण झोपलो होतो असे सांगितले. हा एक प्रकारचा चमत्कारच आहे,’ असं त्यांचा मोठा मुलगा बाळू राम यांनी सांगितलं. आमच्यासाठी यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदाची असल्याचेही ते यावेळी म्हणाले. आता आम्ही धुमधडाक्यात दिवाळी साजरी करणार असल्याचे त्यांचा धाकटा मुलगा रंजित म्हणाले.