आपण भारतीय काही वेळा फारच मजेशीर वागतो. म्हणजे हेच बघाना मोबाईलला रेंज मिळाली नाही की आपण उगाच त्या फोनला मारत काय असतो किंवा तो हवेत पकडून रेंज येतेय की नाही बघण्याचा प्रयत्न तरी करत असतो, सारं काही हास्यास्पदच सुरू असतं. काहींकडे रेंज मिळवण्याचे यापेक्षाही १०१ ‘जुगाड’ असतात. पण हे झालं आपल्या सामान्य माणसांचं वागणं पण तुम्ही कधी मंत्रीबुवांना असं वागताना पाहिलंत का? नाही ना मग हे पाहाच. भाजपाचे मंत्री अर्जुन राम मेघवाल फोनला रेंज मिळत नाही म्हणून चक्क झाडावर चढले.

त्याच झालं असं की राजस्थानचे अर्थमंत्री अर्जुन मेघवाल रविवारी आपल्या गावी डोलियाला गेले होते. गावातल्या रुग्णालयात परिचारिकांची संख्या कमी असल्याची गावकऱ्यांची तक्रार होती. तेव्हा मेघवाल यांनी स्वत: जाऊन गावकऱ्यांची भेट घेतली, गावकऱ्यांची समस्या लक्षात आल्यानंतर सूचना देण्यासाठी त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना फोन लावला, पण रेंज नसल्याने फोन काही लागेना. तेव्हा कोणीतरी ‘त्या झाडावर चढा म्हणजे मोबाईलला रेंज मिळेल’ असं म्हटलं. मग काय फोन करण्यासाठी मंत्रीबुवा झरझर झाडावर चढलेही. आता एकीकडे डिजिटल इंडियाचे नारे सरकारकडून दिले जात असताना दुसरीकडे भाजपाच्या मंत्र्याला एक फोन करण्यासाठी झाडावर चढण्याचा जुगाड करावा लागतोय हे पाहून कोणी कपाळावर हात मारला नाही तर नवल.

Story img Loader